महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
महाड एमआयडीसीतील सवाने ग्रामपंचायत हद्दीतील खैरे गावाशेजारी सुदर्शन फार्मा या नावाने नवीन कंपनीचे काम चालू आहे. मागील वर्षापासून या कंपनीला येथील ग्रामस्थांचा कडक विरोध होता आणि आजही आहे. एक वर्ष उलटल्यानंतर आज पुन्हा पोलीस बंदोबस्तामध्ये या नवीन कंपनी कामाला सुरुवात झाली, कामाला सुरुवात झाल्याची बातमी ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी कंपनीच्या गेटवरच तीव्र आंदोलन छेडून काम बंद पडले…तसेच जेसीबी ऑपरेटर आमच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न करीत होता याचाच राग मनात धरून जेसीबी व्यावसायिक तक्रारदार निसार इब्राहिम दरेकर हे घटनास्थळी आल्यानंतर त्यांच्या ताब्यातील ब्रेजा कार खैरे ग्रामस्थांनी अडवून धरली. यामध्ये जेसीबी मालक निसार दरेखाने यांना मारहाण व शिवीगाळ तसेच दमदाटी करून त्यांच्या ब्रेझा कार गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आल्याची तक्रार निसार दरेखान यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. सुरुवातीला कमी बंदोबस्त असल्यामुळे पोलिसांची आणि ग्रामस्थांची शाब्दिक बाचाबाची देखील झाली होती, ग्रामस्थांचं तीव्र आंदोलन आणि आक्रोश पाहिल्यानंतर पोलिसांकडून बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 126(2), 289(1), 190, 352, 351(2),324 (4), 115 प्रमाणे 50 ते 60 महिला व पुरुष खैरे ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड हे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.