महाड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
विधानसभा निवडणुकीनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. याच तोंडावर कोकणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. त्याची तयारी महायुतीकडून सुरु झाल्याची चर्चा आहे. रायगड जिल्ह्यातील महाड येथील माजी नगराध्यक्षा आणि ठाकरे गटाच्या विधानसभा निवडणूक उमेदवार स्नेहल जगताप या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. स्नेहल जगताप या भरत गोगावले यांच्या कट्टर विरोधक असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशानंतर महायुतीतही ठिणग्या उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे…त्यामुळे रायगड जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाला लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर महाविकास आघाडी मधील अनेक नेत्यांचे महायुतीमध्ये पक्षप्रवेश होण्याचे संकेत मिळत आहेत.स्नेहल जगताप या महाडचे तत्कालीन माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते कै.माणिकराव जगताप यांच्या सुकन्या आहेत. त्या यापूर्वी महाडच्या नगराध्यक्ष राहिल्या आहेत. मात्र राज्यातील राजकीय घडामोडीनंतर त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर अलिकडे त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती. आता स्नेहल जगताप यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याची तयारी सुरू झाली आहे. स्नेहल जगताप यांच्या प्रवेशाने भाजपला महाड परिसरात राजकीय बळ मिळणार आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन या पक्षप्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे. स्नेहल जगताप या मंत्री भरत गोगावले यांच्या राजकीय विरोधक म्हणून ओळखल्या जातात.