हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर… रोह्यात गरुड झेप फाउंडेशनच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन…

0
44

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गरुड झेप फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल 58रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता…मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित या शिबिराचे उद्घाटन ठाकरे गटाचे रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली  वाहिली. या शिबिराचे आयोजन गरुड झेप फाउंडेशनचे अध्यक्ष दुर्गेश नाडकर्णी यांनी केले होते.दरवर्षीप्रमाणे यंदाही गरुड झेप फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर राबवले…गेल्या १३ वर्षांपासून फाउंडेशनकडून या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्यातून अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात, असा संदेश या शिबिराच्या माध्यमातून देण्यात आला. रक्तदान शिबिरात तरुणाईसह विविध सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनीही उत्साहाने सहभाग घेतला. महिलांचाही मोठा प्रतिसाद दिसून आला. या वेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि अल्पोपहार देण्यात आला…कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गरुड झेप फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. रक्तदान हे आरोग्यासाठी लाभदायक असून समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आवाहन आयोजकांनी केले…