रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
रायगड मधील अलिबाग तालुक्यात रेवदंडा-बेलकडे फाटा दरम्यान आक्षी पुला नजिक एमएच ४३ एअर ४२२० या स्कोडा गाडीला अपघात होऊन सुरज राहुल देशपांडे (३४), रा. भैरवनगर, कुसगांव, लोणावळा, पुणे यांचा मृत्यू झाल्याची फिर्याद निलेश ज्ञानेश्वर पवार (३२), रा. मंडाले, पोस्ट-टाकवे खुर्द, ता. मावळ, जि. पुणे, यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दिली आहे. सविस्तर माहिती अशी की, मयत-सुरज देशपांडे हा त्याचा मित्र निलेश पवार सह आणखी एका मित्रासह तिघेजण त्यांच्या स्कोडा गाडीने २७/०१/२०२५ रोजी रात्री १०.३० घ्या दरम्यान लोणावळा येथून नांदगांव, अलिबाग येथे फिरायला आले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे २८/०१/२०२५ रोजी पोहोचल्यावर समुद्रावर फेरफटका मारल्यावर तेथून लोणावळा येथे माघारी येताना ही दुर्दैवी स. ६.३० घ्या सुमारास घटना घडली. यावेळी सुरज देशपांडे हा ड्रायव्हिंग करत होता, एकाएकी अक्षी पुलाच्या वळणावर सुरजचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी उजवीकडील झाडावर धडकून पलटी झाली. अपघात घडताच तेथील नागरिकांनी प्रथम सुरजच्या शेजारी सीटवर बसलेल्या निलेश पवार याला बाहेर काढले व नंतर सुरज देशपांडे यास बाहेर काढले. सुरजच्या मानेला गळ्याजवळ जखम झाल्याने अती रक्तस्रावाने तो बेशुद्धावस्थेत होता. जमलेल्या नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावून त्याला अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर अपघात कक्षाच्या डॉक्टरांनी तपासणी करून तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे सांगितले. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी अपघातग्रस्त वाहनातील मृत व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे विशद केले आहे. याबद्दलची फिर्याद अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल असून पोलीस निरीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग पोलीस अधिक तपास करीत आहेत.