उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):-
उरण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या चिर्ले ते दिघोडे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असल्याने जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे छोट्या वाहनचालकांचा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अटल सेतूवरुन मुंबई-कोकणाकडे जाणाऱ्या या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
उरण परिसरातील विद्यार्थी आणि नोकरीनिमित्ताने प्रवास करणारे चाकरमानी नेहमी दिघोडे – चिर्ले या रस्त्याचा वापर करत असतात.तसेच मुंबईकडून अटल सेतूवरुन कोकणाकडे जाणारे पर्यटक, चाकरमानी हे ही दिघोडे – चिर्ले या रस्त्यावरून प्रवास करत आहेत…या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे… रस्त्यावर खड्डे पडले असून हे खड्डे अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रस्त्यावरील धुळकण हवेत उडत असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच रस्त्यावर दररोज वाहतूककोंडी होत असून त्याचा मनस्ताप कामगार, विद्यार्थी, रुग्णांना बसत आहे.रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघाताची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे.तरी अटल सेतूवरुन मुंबई कोकणाकडे जाणाऱ्या या मार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे…