रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
रायगडच्या पालकमंत्री पदाची भिजत घोंगड अद्यापही कायम आहे…रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे.रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्री भरत गोगावले इच्छूक आहेत ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही…रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याची नामुष्की महायुती सरकारवर आली…त्यानंतर रायगडचे पालकत्व घेण्यासाठी भरत गोगावले सरसावले आहेत.पालकमंत्रीपदाचा वाद सुरु असतानाच मंगळवारी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील दालनात ऑनलाईन पद्धतीने रायगड जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्याचा आढावा घेतला. यामध्ये बैठकीला फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या…आधी मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. त्यानंतर पालकमंत्रीपदाच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस सुरू झाली. मोठ्या संघर्षानंतर पालकमंत्रीपदाचं वाटप करण्यात आलं. मात्र त्यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली. रायगडच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेचा दावा आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले आणि आदिती तटकरे इच्छुक आहेत. हा तिढा सोडवण्याचं मोठं आव्हान महायुती सरकारसमोर आता उभे राहिले आहे.अशातच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भरत शेठ गोगावले यांची नियुक्ती व्हावी, यासाठी रोहा तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी श्री अष्टविनायक गणरायाच्या चरणी साकडे घातले.शिवसेना रोहा तालुका प्रमुख ऍड. मनोजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी हे साकडे घातले. यावेळी रोहा शहर प्रमुख मंगेश रावकर,चणेरा संपर्कप्रमुख भालचंद मोरे यांच्यासह तालुक्यातील अन्य पदाधिकारी उपस्थित होते…शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते, भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास वेगाने होईल आणि शिवसेनेला अधिक बळ मिळेल. त्यामुळे त्यांची नियुक्ती होण्यासाठी सर्व पदाधिकारी प्रार्थना करत आहेत…आधी मंत्रिपदासाठी देव पाण्यात बुडवून ठेवलेल्या भरत गोगावले यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मंत्रीपदाचा कोट घातलेल्या भरत गोगावले यांना आता रायगडचं पालकमंत्रीपद खुणावू लागलं. त्यामुळे रायगडचं पालकत्व मिळवण्यात भरत गोगावले यांना यश येणार का, हा खरा प्रश्न आहे.