रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला प्रखरतेने वाचा फोडण्यासाठी, कायम अग्रेसर असणाऱ्या रायगड प्रेस क्लबचा 20 वा वर्धापन दिन व पत्रकार सन्मान सोहळा अत्यंत उत्साही व दिमाखदार पद्धतीने खोपोली येथे पार पडला. खालापूर प्रेस क्लब यांच्या संयोजनातून या सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते. यावेळी टीव्ही व प्रिंट रिपोर्टर धम्मशील सावंत यांना दीपक शिंदे स्मृती व्हिडीओ जर्नालिस्ट पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. पत्रकार धम्मशील सावंत यांनी पाली बेणसे सारख्या ग्रामीण भागात पत्रकारिता करीत असताना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील वृत्त वाहिन्यांपर्यंत झेप घेण्याचे कर्तृत्व साध्य केले आहे. विविध वर्तमान पत्राच्या माध्यमातून जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे प्रभावी काम केले आहे. दुर्गम, डोंगराळ आदिवासी वाड्या पाड्या पर्यंत पोहचून त्यांच्या समस्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. त्यांच्या याच कर्तृत्वाचा गौरव म्हणून रायगड प्रेस क्लब च्या वतीने दीपक शिंदे स्मृती व्हिडीओ जर्नालिस्ट पुरस्काराने पत्रकार धम्मशील सावंत यांना गौरविण्यात आले. या सोहळ्यात खासदार सुनिल तटकरे, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, 18 लोकमतचे प्रख्यात टीव्ही अँकर विशाल परदेशी, प्रशांत (राजू) जोशी,दत्तात्रेय म्हसूरकर , किरण ठाकरे, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, रायगड प्रेस क्लब चे अध्यक्ष मनोज खांबे, नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत गोपाळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.