दुर्मीळ ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादिने केले घरटे… तब्बल १५० अंडी घालून मादी समुद्रात परतली…

0
102

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

अलिबाग जवळच्या किहीम समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले या दुर्मीळ होत चाललेल्या कासवाच्या प्रजातीच्या मादिने मंगळवारी दुपारी भरतीच्यावेळी किना-यावर येवून घरटे करुन तब्बल १५० अंडी घालून मादी समुद्रात परतली असल्याची माहिती रायगड वन विभागाच्या कांदळवन कक्षाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर समीर शिंदे यांनी बोलताना सांगितले आहे… तब्बल ४० वर्षांच्या प्रदिर्घ कालावधीनंतर ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादीने किहीम समुद्र किनारी घरटे करुन अंडी घातली असल्याची माहिती येथील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांनी दिली आहे… परिणामी किहीम समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षिततेवर ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादीने या निमित्ताने शिक्कामोर्तब केले आहे… किहीम येथे ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्र कासवाने घातलेली अंडी दुर्मिळ असल्याने त्याचे संरक्षण करण्यात येत आहे… संरक्षणासाठी घरट्याच्या चारही बाजूने जाळी लावून तेथे रखवालदार नियुक्त करण्यात आला असल्याचे शिंदे यांनी पुढे सांगितले…

दरम्यान, तब्बल ४० वर्षाने समुद्री कासवाने किहीम समुद्र किनारी घरटे करुन अंडी घातलेल्या ठिकाणी वन विभागाच्या कांदळवन विभागाच्या उप वनसंरक्षक कांचन पवार, वन अधिकारी प्रियांका पाटील, आरएफओ समीर शिंदे व किहीम ग्रामपंचायत सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी करुन संरक्षणात्मक उपाययोजना केल्या आहेत… प्राकृतिक अधिवास उष्णकटिबंध व उपोष्ण कटिबंध असलेल्या ऑलीव्ह रिडले कासवाच्या मादिचे वजन ५० किलोग्रॅमपर्यंत असते तर लांबी ६० ते ७० सेंटीमीटर असते… त्यांचा वीणीचा हंगाम प्रामुख्याने नोव्हेंबर ते मार्च असा पाच महिन्यांचा असतो… रात्रीच्या वेळी मादी अंडी घालते… एका वीणीच्या हंगामात २ ते ३ वेळा साधारणतः अंडी घातली जातात…  मादि एकावेळी १०० ते २०० अंडी घालते… ४५ ते ५५ दिवसात अंडी नैसर्गिकरित्या उबतात व त्यातून पिल्ले जन्माला येतात… येथे देखील पिल्ले जन्माला येई पर्यंत अंड्यांची काळजी घेण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी अखेरीस सांगितले…