सार्वजनिक बांधकाम विभागाचा पळपुटेपणा… सार्वजनीक बांधकाम विभागाच्या जागेत सीआरझेड क्षेत्रात 3 मीटर खोल…

0
17

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

अलिबाग तालुक्यातील मिळकतखार ग्रामपंचायत हद्दिमध्ये मौजे बागदांडा,ता. अलिबाग, जि. रायगड येथील समुद्रकिनारी भरतीरेषेवर असलेल्या भुमापन उपविभाग क्र. 23 या कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम यांच्या जागेत 03 मीटर खोल, 1.5 मीटर रूंद व 41 मीटर लांब बांधकाम सीआरझेडमध्ये केल्याची कबुली शासनामार्फत देवूनही अतिक्रमण करणा-यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणा-या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पळपुटेपणा विरोधात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सदरचे अनधिकृत बांधकाम हे अभिजीत अमित कडवे व गोरखनाथ दशरथ कडवे यांनी केलेले आहे असा स्पष्ट उल्लेख पंचलोकांच्या साक्षीने करण्यात आलेल्या दि. 6 जून 2024 च्या पंचनाम्यामध्ये आहे. बांधकाम करताना कोणत्याही प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली नव्हती. शासकीय मिळकतीत नियमांचे उल्लंघन केल्याने करुन अनधिकृत बांधकाम केलेबाबत ग्रामस्थांनी दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेवून प्रमाणे सरकारी यंत्रणेने संबधीत स्थळाचा सरकारी पंचनामा मंडळ अधिकारी सरळ व तलाठी मिळकतखार यांच्यासमक्ष केला होता. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम यांच्या जागेत सदरचे अनधिकृत बांधकाम केले असल्याने कार्यकारी अभियंता यांनी सदरचे बांधकाम   करणा-या अभिजीत अमित कडवे व गोरखनाथ दशरथ कडवे यांच्यावर गुन्हा दाखल करणे अपेक्षीत असताना सहा महिन्याचा कालावधी उलटल्यावर बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता व्ही.जी.तेलंग यांनी ग्रामपंचायतीस पत्र लिहून काही लोकांनी बांधकाम विभागाच्या भूमापन क्रमांक 23 या जागेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांना दिसून आले असून या जागेत यापूढे अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे कळविले आहे.

वास्तविक पहाता अतिक्रमण करणारे अभिजीत अमित कडवे हे ग्रामपंचायतीचे उपसरपंच व गोरखनाथ दशरथ कडवे हे ग्रामपंचायत सदस्य असून त्यांच्या पत्नी या सरपंच आहेत. थोडक्यात ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांनीच सदरचे अतिक्रमण केले असून बांधकाम विभाग त्यांनाच अतिक्रमण हटविण्यासाठी सांगत असल्याचे पाहून ग्रामस्थ संतप्त झाले असून जर आठ दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत भविश्यात अतिक्रमण होणार नाही या संदर्भात मिळकतखार ग्रामपंचायतीचे सरपंच/ग्रामसेवक यांना पत्र दिले आहे. त्याची प्रत पोलीस निरिक्षक, मांडवा सागरी पोलीस ठाणे तसेच अर्जदार यांना देण्यात आली आहे.