पाण्यासाठी खारेपाटातील महिला आक्रमक… हेटवणे धरणावर हंडा मोर्चा; कोट्यवधी खर्चूनही ग्रामस्थ तहानलेलेच…

0
53

पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी) :-

पेण तालुक्यातील खारेपाटातील नागरिक अनेक वर्षांपासून पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी पाठपुरावा करीत आहेत… यासाठी वेळोवेळी आंदोलनेही करण्यात आली आहेत, मात्र आजही खारेपाट विभाग पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यापासून वंचित आहे… हेटवणे धरणाच्या पाण्यासाठी खारेपाटातील महिला आक्रमक झाल्या असून, मंगळवार दि. ११ रोजी धरणावर जाऊन पाणी भरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे…

खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून मध्यंतरी वाशी येथे आमरण उपोषण सुरू केले असता शेतीच्या सिंचनासाठी ७६६ कोटी मंजूर करण्यात आले…. तसेच कामासाठी प्रशासकीय मंजुरी (सुप्रमा) मिळाल्यानंतर १५ ऑक्टोबर २०२४ ला निविदा प्रक्रिया राबवण्यात आली, मात्र काम सुरू करण्याचे आदेशच आले नाहीत… त्यामुळे खारेपाटातील नागरिकांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे… मंगळवारी मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहून सकाळी ९.३० वाजता हेटवणे धरणावर हंडा घेऊन पाणी भरण्यासाठी जाणार आहेत… धरण जवळ असले तरी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने खारेपाटातील नागरिकांना आंदोलनाचा एल्गार पुकारला होता… कित्येक वर्षे संघर्ष करत हेटवणे मध्यम प्रकल्प चतुर्थ सुप्रमा मंजुरीसाठी व मंजुरीनंतर कामाचे डिझाइन तयार करण्यासाठी आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वच टप्प्यांवर आंदोलन करावे लागले, मात्र आजतागायत नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागले आहे…  त्यामुळे आता स्थानिक महिला धरणातूनच पाणी भरणार असून, याबाबतचे निवेदन खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी यांना देण्यात आले होते… यावेळी प्रकाश माळी, नंदा म्हात्रे, राजन झेमसे, हेमंत पाटील, अभिमन्यू म्हात्रे, अजित पाटील, संतोष ठाकूर, बळीराम म्हात्रे, जितू ठाकूर, प्रसाद पाटील, महेंद्र ठाकुर, सि आर म्हात्रे, ग्रामस्थ महीला उपस्थित होत्या…