दापोली शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
दापोली आगारात प्रवाशी राजा दिन निमित्ताने आयोजित मेळावा रत्नागिरी जिल्ह्याचे विभाग प्रमुख श्री. प्रज्ञेश बोरसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी दापोली नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष श्री. किशोरभाई देसाई यांनी दापोली आगारातील मुजोर, कामचुकार व आगार अंतर्गत युनियनच्या गटबाजीने प्रवाशांची करण्यात येणारी ससेहोलपट व आगार प्रमुखांचा मनमानी कारभार यावर चांगलेच ताशेरे ओढले, आणि चालक-वाहक यांच्या युनीयनबाजीने दिवसेंदिवस प्रवाशांना जाणीवपूर्वक छळवाद मांडणाऱ्यांचे भिंग फोडले.जिल्ह्या बाहेरील आगारातून दापोलीसाठी सेवा देतांना मनमानी पद्धतीने केली जाते म्हणून पुणे-दापोली, मुंबई -केळशी या सेवा पुणे किंवा मुंबई आगारां ऐवजी दापोली आगाराकडे वर्ग करण्यात याव्यात अशा सुचक मागण्या करण्यात आल्या…
येथील उद्धाम कर्मचारी वर्गाचे उदाहरण देताना देसाई सांगत होते की… दापोली-म्हैसोंडे ही लोकल सर्व्हिस दु. १२.००ची व २.००ची आहे त्याऐवजी नेहमीच चालक/वाहक यांच्या सोयीपरत्वे दु.१२.००ची बस रद्द करून एकच दु.२.००ची बस फलाटावर लावण्यात येते. याबाबत प्रवाशांनी चौकशी करता एकतर त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही, नाहीतर कधी वाहक उपलब्ध नसतो तर कधी चालक नाही असे सांगितले जाते तर बहुधा गाडी उपलब्ध नाही असे सांगितले जाते.म्हणजेच आगारातील कर्मचारी वर्गाला प्रवाशांचे सोयर-सुतक नसल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे उपस्थित श्री. प्रज्ञेश बोरसे यांच्या नजरेस आणून देण्यात आले. यावेळी वर्षा शिर्के आणि म्हैसोंडे येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच दापोली -मंडणगड प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष श्री. शैलेंद्र केळकर, खजिनदार खलपे,कोंकण एस. टी. प्रेमी ग्रुपचे विकास गुरव, हर्णै येथील सामाजिक कार्यकर्ते वाजीद खान, मुरुड येथील भावे, खोत आणि एस.टी. अधिकारी वर्गाची प्रकर्षाने उपस्थिती होती…