नागाव जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न… स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांसाठी खास बाळ आनंद मेळाव्याचे आयोजन…

0
42

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

नवी मुंबईतील समाविष्ट गावांपैकी नागाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडले. १९३९ पासून ही शाळा शिक्षणप्रसाराचे कार्य अविरतपणे करत असून,स्नेहसंमेलन हा येथील शालेय परंपरेतील एक महत्त्वाचा सोहळा ठरला आहे.स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. नृत्य, नाटिका, हास्य विनोद आणि डीजेवर ताल धरत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. विशेष आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी सादर केलेले लोकनृत्य व देशभक्तीपर गीतांवरील नृत्य प्रस्तुती. या कार्यक्रमांसाठी शालेय परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता.

या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांसाठी खास “बाळ आनंद मेळावा” आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने विविध पदार्थ तयार करून विक्री केली. लिंबू सरबत, वडापाव, समोसा, शीरखुर्मा, फळांचा मिक्स जूस, भेळ, चायनीज पदार्थ, ताक आदी विविध प्रकारच्या चटकदार पदार्थांचा ग्रामस्थ आणि पालकांनी आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांनी स्वतः व्यवसायिक दृष्टिकोन ठेवून पदार्थ सादर केले याची विशेष दखल उपस्थितांनी घेतली.
या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, तरुणमंडळी, महिला वर्ग, शालेय व्यवस्थापन समिती, स्वयंसेवक, शिक्षक, शिक्षिका शाळेच्या मुख्यध्यापिका भोसले मॅडम,सुभाष कणसे सर,प्रकाश पाटील सर ,संगीता गायकवाड मॅडम,यांचा मोठा सहभाग लाभला. सर्वांनी मेहनत घेत शाळेच्या या परंपरेला पुढे नेण्यासाठी योगदान दिले.
अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो तसेच त्यांना विविध कौशल्ये आत्मसात करता येतात. नागाव शाळेचे हे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले आणि उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे कौतुक केले.