भान विसरून ती समुद्राकडे एकटक पाहत राहिली …एका मोठ्या लाटेने समुद्रात नेलं आणि होत्याच नव्हतं झालं…

0
63

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ) :-

दोन दिवस सलग सुट्टी असल्याने रायगडमधील हरिहरेश्वर येथे फिरण्यासाठी गेलेल्या महिलेचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. एका दगडावर बसून समुद्राकडे पाहत बसलेल्या या महिलेला एका मोठ्या लाटेने समुद्रात नेलं. या महिलेला बाहेर काढून वाचवण्याचा अतोनात प्रयत्न करण्यात आला. पण त्यामध्ये यश आलं नाही. पल्लवी सरोदे असं या मृत महिलेचं नाव असून त्या ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात काम करत होत्या.

याबाबत मिळालेली माहिती अशी, ठाणे जिल्हाधिकारी यांच्या पीए आणि सोबत आठ महिला कर्मचारी या शनिवार-रविवार या सलग सुट्टी असल्याने दक्षिण रायगडमधील श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे फिरण्यासाठी आल्या होत्या. शनिवारी मंदिर परिसर फिरून झाल्यावर रविवारी सकाळी हे कर्मचारी मंदिरात पुन्हा दर्शन घेऊन समुद्राची प्रदक्षिणा मारण्यासाठी निघाल्या.

इतर कर्मचारी प्रदक्षिणा मारत असताना समुद्र किनारी असणाऱ्या दगडावर पल्लवी सरोदे या समुद्राकडे पाहत बसल्या होत्या. मात्र समुद्रातून आलेली एक मोठी लाट पल्लवी यांना समुद्रात घेऊन गेली आणि होत्याच नव्हतं झालं. या प्रवाहात पल्लवी या बुडून मरण पावल्या. यावेळी साळुंखे रेस्क्यू टीमकडून पल्लवी यांना समुद्रातून बाहेर काढण्यात आलं आणि त्यांचा जीव वाचवण्याचा अतोनात प्रयत्न करण्यात आला. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले…