पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):-
अनेक वर्षांच्या लढ्यानंतर मुंबई गोवा महामार्गाचे उत्कृष्ठ दर्जाचे काम सुरू आहे, मात्र सध्या याच महामार्गावर चोरांचा सुळसुळाट वाढला आहे… गुरुवार २७ मार्चच्या रात्री २ च्या सुमारास कर्नाळा अभयारण्यात प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावलेल्या लोखंडी पत्र्यांचे बॉक्स चोरून टेम्पोतून पळवून नेताना तेथील जागृत वाहन चालकांनी पकडला… दरम्यान झालेल्या झटापटीत मात्र सदर आरोपी दाट अंधाराचा फायदा घेत संरक्षक भिंतीवरून उड्या मारून जंगलात पळाले…
सविस्तर घटना अशी की, मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्यात माकडं व इतर प्राणी रस्त्यावर येऊ नयेत म्हणून सदर प्राण्यांच्या संरक्षणासाठी उंच लोखंडी पत्र्यांचे बॉक्स लावण्यात आलेले आहेत… मात्र गुरुवारी दि.२७ मार्च च्या रात्री २ च्या सुमारास मुंबईहून पेणच्या दिशेने काही तरुण जात असताना MH 46 BM 0474 क्रमांकाच्या टेम्पो मध्ये सदर लोखंडी पत्र्यांचे बॉक्स काही अज्ञात चोरत असल्याने निदर्शनास आले…यावेळी सदर जागृत तरुणांनी गाडी थांबवून याबाबतीत भामट्यांना विचारायला गेल्यावर झटापटीला सुरुवात झाली…दरम्यान तात्काळ पनवेल पोलिसांना मोबाईल वरून संपर्क करत असताना टेम्पो मधील तिन्ही जणांनी दाट अंधाराचा फायदा घेत संरक्षण भिंतीवरून उड्या मारून जंगलाच्या दिशेने पलायन केले..
त्यानंतर काही वेळाने निर्भया पथकाचे पोलीस कर्मचारी शिल्पा कवी व धनंजय पाठारे घटनास्थळी दाखल झाले असता सदर चोरीतील लोखंडी बॉक्सने भरलेला टेम्पो, चावी व मोबाईल रात्री ३:३० सुमारास पोलिसांच्या ताब्यात घेतले… चोरीतील तिन्ही आरोपी जरी फरार असले तरी लोखंडी पत्र्यांनी भरलेला टेम्पो मात्र पोलिसांच्या ताब्यात आहे…