चिपळूणमध्ये वाळू माफियांकडून महिला पत्रकारावर जीवघेणा हल्ला… तीन हल्लेखोरांविरोधात चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल…

0
43

चिपळूण शिवसत्ता टाइम्स (अमूलकुमार जैन):- 

चिपळूणमध्ये खाडी पट्ट्यात अवैध्य वाळू उपश्याचे चित्रीकरण करायला गेलेल्या महिला पत्रकारावर वाळूमाफियांकडून जीवघेणा हल्ला झाला आहे…चिपळूण येथे कार्यरत असलेल्या महिला पत्रकार स्वाती हडकर यांच्यावर रविवारी रात्री वाळू माफियांनी क्रूर हल्ला चढवला…या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यासोबत विनयभंगाचा प्रयत्न देखील करण्यात आला. ही धक्कादायक घटना केतकी खाडी परिसरात घडली. सध्या स्वाती हडकर यांच्यावर कामथे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मराठी पत्रकार परिषदेने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आरोपींवर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, पीडित पत्रकार स्वाती हडकर आपल्या सहकाऱ्यांसोबत केतकी खाडी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननाचे चित्रीकरण करण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाळू माफियांनी तीन गाड्यांमधून येत त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी प्रथम स्वाती यांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी स्वाती आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण केली, ज्यात स्वाती गंभीर जखमी झाल्या.

या गंभीर घटनेनंतर चिपळूण पोलीस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दरम्यान, मराठी पत्रकार परिषदेने या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. परिषदेने वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, आरोपींवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे…मराठी पत्रकार परिषदेचे शिष्टमंडळ जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहे.