माणगाव परिसरात विचित्र हवामानाची परिस्थिती… उष्णतेसोबत अधूनमधून जोरदार गारवाऱ्यांचा अनुभव…

0
31

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

माणगाव व परिसरात मागील काही दिवसांपासून हवामानात असामान्य बदल दिसून येत आहेत…एप्रिल महिना म्हणजे कडाक्याच्या उन्हाचा कालावधी,मात्र यंदा या उष्णतेसोबतच अधूनमधून जोरदार वाऱ्यांचे सुसाट झोत जाणवू लागले आहेत…विशेष म्हणजे कधी गरम वाऱ्याचा भडका तर कधी गार वाऱ्याचा अनुभव यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या भागातील हवामानात अचानक बदल घडत आहेत…  कडक उन्हाच्या वेळी अचानक जोरदार वाऱ्यांची झड सुरू होते…काही वेळा या वाऱ्यांमुळे मातीचा धुरळा उडून परिसरात धूसरता पसरते आणि जनजीवन विस्कळीत होते…विशेषतः१२ व १३ एप्रिल रोजी दुपारी तीननंतर आकाश ढगांनी भरलेले असूनही पावसाची शक्यता असतानाही पाऊस पडला नाही, मात्र गार वाऱ्याने वातावरणात गारवा निर्माण झाला…

१३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता,कडक उन्हाच्या वेळीही जोरदार वारे वाहू लागले. यामुळे नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली…इतक्या उन्हातही असा गारवा आणि वारा?सायंकाळी ७:२० वाजताही आकाश ढगांनी भरलेले असूनही पाऊस झाला नाही मात्र हवेत गारवा जाणवत होता. त्यामुळे परिसरात कुठे तरी पाऊस झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली…

या अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे विद्युत पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे…गेल्या तीन दिवसांपासून अनेक वेळा वीज खंडित होत आहे. १३ एप्रिल रोजी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून थेट विद्युत तारांवर पडल्याने १४ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी दीड वाजेपर्यंत विद्युत कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचे काम सुरू होते…आज,१५ एप्रिल रोजीही सकाळी १०:३० वाजता वीज खंडित झाली होती…

या हवामानामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे…अनेक महिला पापड, धान्य, मासे वाळविण्याच्या कामात व्यस्त असतानाच अचानक वाऱ्यामुळे ही कामे अडथळ्यात आली. काही लोक आपल्या कामे वेळेत पूर्ण झाल्यामुळे समाधानी दिसत होते,तर काहींमध्ये काम उरकण्याची घाई आणि चिंता दिसून आली.निसर्गाच्या या अनिश्चित वळणामुळे यंदा पावसाळा लवकर सुरू होणार असल्याचे अनुमान नागरिकांमध्ये व्यक्त केले जात आहे…मात्र पुढील हवामान कसे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.