पवित्र गुरुवार : प्रेम, सेवा आणि त्यागाचा अमूल्य संदेश…

0
27

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

ख्रिस्ती धर्मातील अत्यंत पवित्र आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा पवित्र गुरुवार (Maundy Thursday) माणगाव येथील सेंट अरनॉल्ड चर्चमध्ये दिनांक १७ एप्रिल रोजी अत्यंत श्रद्धेने पार पडला. प्रभु येशू ख्रिस्त यांच्या शेवटच्या भोजाची आठवण करून देणारा, त्यांचा नम्रता आणि सेवाभाव यांचा संदेश देणारा हा दिवस ख्रिस्ती समाजात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी येशू ख्रिस्तांनी आपल्या बारा शिष्यांचे पाय धुतले, पवित्र युकरिस्ट (पवित्र यज्ञ) ची स्थापना केली आणि ख्रिस्ती पुरोहिताईची सुरुवात केली. या तीन पवित्र घटनांचा उल्लेख ख्रिस्ती धर्मग्रंथात स्पष्टपणे आढळतो.

गुड फ्रायडे (शुभ शुक्रवार) च्या पूर्वसंध्येला साजरा होणाऱ्या या दिवशी माणगावमधील ख्रिस्ती बांधव सायंकाळच्या प्रार्थना सभेसाठी चर्चमध्ये एकत्र आले होते. या वेळी मुख्य पुरोहित फादर थॉमस यांनी येशू ख्रिस्तांनी दिलेल्या सेवाभावाच्या आणि नम्रतेच्या उदाहरणाचे अनुसरण करत, उपस्थित १२ भक्तांचे पाय धुतले.

या विधीनंतर सर्वांनी आपापल्या घरी तयार केलेले अन्न सामूहिकपणे सेवन करत बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश जपला. पवित्र गुरुवारानंतर येणारा गुड फ्रायडे हा प्रभु येशू ख्रिस्त यांच्या क्रूसावरील बलिदानाचा दिवस असून, या दिवशी प्रार्थना, क्रूसाचा वाट (Way of the Cross), उपवास आणि इतर धार्मिक विधी पार पडतात.

यानंतरचा काळा शनिवार आणि त्यानंतर येणारा ईस्टर संडे हा येशू ख्रिस्तांच्या मृत्यूनंतरच्या पुनरुत्थानाचा विजयदिवस म्हणून मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. या संपूर्ण काळात लेन्टन सिझन म्हणजेच उपवासाचा पवित्र काळ पाळला जातो. यंदा हा काळ ५ मार्चपासून सुरू होऊन १९ एप्रिल रोजी संपणार असून, या ४० दिवसांत, विशेषतः प्रत्येक शुक्रवारी, ख्रिस्ती बांधव उपवास, प्रार्थना आणि आत्मपरीक्षण करतात.

ही संपूर्ण धार्मिक परंपरा होली वीक — पवित्र आठवडा — या स्वरूपात साजरी केली जाते. “जशी मी तुमच्यावर प्रीती केली, तशीच एकमेकांवर करा” — हा येशू ख्रिस्तांनी दिलेला प्रेम, सेवा आणि त्यागाचा संदेश ख्रिस्ती जीवनाचा मूलमंत्र ठरतो. पवित्र गुरुवार हा भक्ती, कृतज्ञता आणि आत्मपरीक्षणाचा दिवस असून, येशू ख्रिस्तांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा नवा संकल्प करण्याची प्रेरणा देणारा आहे.