माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
द. ग. तटकरे महाविद्यालय,माणगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या ईद मिलन आणि रोजा विषयावरील विशेष कार्यक्रमात प्रख्यात वक्ते डॉ. रफिक पारणेकर यांनी रोजा हे केवळ उपवास नसून आत्मिक, मानसिक आणि शारीरिक शुद्धीकरणाचे प्रतीक असल्याचे सांगत, तो सर्व मानवजातीसाठी संयम, सहानुभूती आणि बंधुत्वाचा संदेश देतो असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्राचार्य बी.एम. खामकर, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र आचार्य, प्राध्यापक डॉ. पांडे, वरिष्ठ लिपिक सतीश केकाणे, ग्रंथालय विभागप्रमुख डॉ.संगीता उत्तेकर यांच्यासह महाविद्यालयातील अनेक शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…
आपल्या भाषणात डॉ. पारणेकर यांनी कुराणातील “एक अल्लाह, एक मानवता” या विचाराला अधोरेखित करत, भारतीय संविधानातील ‘बंधुता’ या मूल्याशी त्याचा जवळचा संबंध असल्याचे स्पष्ट केले. “रोजा ही मानवतेचं प्रतीक आहे… धर्माच्या पलीकडचं,”असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने कुराण शरीफचे प्रती महाविद्यालयाचे प्राचार्य,मुख्याध्यापक,लायब्ररी विभागप्रमुख व कार्यरत कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. इस्लाम धर्माशी संबंधित काही महत्त्वपूर्ण पुस्तकांचे संच विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी ग्रंथालयास भेट स्वरूपात सुपूर्द करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जमाते इस्लामी हिंद,रायगड जिल्हा अध्यक्ष फसिहउद्दीन फलाही, माणगाव शहर अध्यक्ष बशीर करेल आणि त्यांच्या टीमचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. डॉ. पांडे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. आचार्य यांनी केले.कार्यक्रमानंतर उपस्थित प्राचार्य, प्राध्यापक व महिला कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले.