मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा अपघात; ८ जण गंभीर जखमी…

0
14

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही.आज पुन्हा एकदा इंदापूरजवळील डायव्हर्जनच्या ठिकाणी भीषण अपघात घडला आहे. सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पो आणि छोटा हत्ती यांच्यात समोरासमोर धडक होऊन ८ जण गंभीर जखमी झाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११ मे रोजी सकाळी आयशर टेम्पो (क्र. GJ 18 BV 7151) चालक नरेंद्रसिंग रजपूत (वय ३०) हा गोवा बाजूकडून मुंबईकडे जात असताना इंदापूरजवळील महामार्गावरील डायव्हर्जनकडे दुर्लक्ष करून सरळ पुढे गेल्याने समोरून येणाऱ्या छोटा हत्ती (क्र. MH 47 AS 5889) टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, एकूण आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार फडताडे करत आहेत.