माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
माणगाव शहराची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी माजी सैनिक, स्वयंसेवी संस्था आणि पोलीस प्रशासन शनिवारी दि.10 मे रोजी एकत्र येऊन माणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. निवृत्ती बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस वीर यशवंतराव घाडगे माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष श्री.सहदेव खैरे,सचिव ऋषिकेश शिंदे, तसेच चारिझेन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन निर्मल सिंह रंधवा यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते…बैठकीत शहरातील सुरक्षाव्यवस्था अधिक प्रभावी कशी बनवता येईल, यावर सखोल चर्चा झाली. पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी सर्व प्रतिनिधींनी एकमताने पाठिंबा दर्शवला.
महत्त्वाचे ठरलेले मुद्दे:-
शहरातील सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग वाढवणे.
नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून कोणतीही संशयास्पद हालचाल तातडीने पोलिसांपर्यंत पोहोचवणे.
माजी सैनिक आणि निवृत्त सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा लाभ घेऊन एक प्रशिक्षित स्वयंसेवक गट तयार करणे.
युवकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेबाबत जागरूकता निर्माण करणारे विशेष उपक्रम राबवणे.
बैठकीदरम्यान पत्रकार बांधवांनी आणि स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांनीही माणगावच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.पोलीस निरीक्षक बोराडे यांनी माणगावकरांना आवाहन करत सांगितले की, “शहराच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीही माहिती असल्यास ती निसंकोचपणे पोलीस ठाण्यात कळवावी, हीच आपल्या सुरक्षिततेची खरी जबाबदारी आहे.”माणगावच्या सुरक्षेसाठी एकत्रितपणे उचललेले हे पाऊल भविष्यातील संकटांना रोखण्यासाठी निश्चितच एक सकारात्मक दिशा ठरेल.