रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
रोहा तालुक्यातील बेलवाडी येथे गावठी दारूधंद्याविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणाला गावठी दारू विक्रेत्यांनी चक्क रस्त्याच्या मिटिंगचे कारण सांगत जबर मारहाण केली. या प्रकरणी तरुणाने रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गावात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूधंद्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बेलवाडीमध्ये काही दिवसांपूर्वी एलसीबीने अवैध गावठी दारूच्या अड्ड्यांवर कारवाई केली होती. या कारवाईमुळे चिडलेल्या दारू विक्रेत्यांनी पोलिसांना माहिती दिल्याचा संशय गावातील एका तरुणावर घेतला. याच रागातून त्याला जाणीवपूर्वक मारहाण करण्यात आली. यासाठी गावात रस्त्याच्या विषयावर मिटिंग असल्याचे भासवून या तरुणाला बोलावण्यात आले. मात्र बैठकीत रस्त्याचा विषय बाजूला ठेवत, गावठी दारूच्या विषयावरून बाचाबाची करत त्याच्यावर हल्ला चढवण्यात आला.
या संपूर्ण प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित तरुणाने थेट रोहा पोलीस ठाणे गाठून घटनेविषयी सविस्तर तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे, बेलवाडी गावात चार-पाच घरे सोडल्यास उर्वरित बहुसंख्य घरे गावठी दारूच्या धंद्यात गुंतलेली आहेत. मात्र या अवैध धंद्यांवर रोहा पोलीस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गावातील तरुणांनी चेतावणी दिली आहे की, जर लवकरच गावातील गावठी दारूचे अड्डे बंद झाले नाहीत, तर ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.