रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
राजकारणात कधी कोण कुठे जाईल आणि कोण कुठे येईल याचा थांगपत्ता कोणीही सांगू शकत नाही.रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट (शिवसेना) यांच्यात एकमेकांचे कार्यकर्ते आपल्याकडे येऊन पक्ष कसा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकासमोर उभा राहील यासाठी एकमेकाचे कार्यकर्ते यांचा प्रवेश सोहळा देखील जंगी स्वरूपात साजरा केला जात असल्याचे रायगड जिल्ह्यातील चित्र आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड खासदार सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून मानले जाणारे नड गावचे माजी सरपंच संजय देशमुख यांनी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थित महाड येथे प्रवेश केला आहे. संजय देशमुख यांचा मंत्री भरत गोगावले यांनी प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड खासदार सुनील तटकरे तसेच महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगतात यांना जोरदार धक्का दिला असल्याची चर्चा महाड तालुक्यात सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पक्षप्रवेशाचे औचित्य घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर साधण्यात आले.यावेळी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री आणि महाडचे आमदार भरतशेठ गोगावले तसेच युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य आणि कोकण सचिव विकास शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.संजय देशमुख हे एकेकाळी अपक्ष म्हणून नडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी खासदार तटकरे यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र गेल्या काही काळापासून ते शिवसेना नेते विकास गोगावले यांच्या संपर्कात होते, आणि अखेर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
या घडामोडींमुळे नडगाव ग्रामपंचायतीत आधीपासूनच बळकट असलेल्या शिवसेनेची ताकद आता अधिकच वाढली आहे. मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या विकासकामांवर विश्वास ठेवून, अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे चित्र दिसत आहे.महाडमध्ये शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीत आणि प्रभावात लक्षणीय वाढ होत आहे.या घडामोडींचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर नक्कीच परिणाम होण्याची शक्यता असून,महाड परिसरातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असल्याचे स्पष्ट होते.