अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आवास गावांत (गुरुवार 22 मे) रोजी सव्वा नऊ वाजता भांडणाच्या रागातून चाकू, सुरा, तलवारीसह राणे कुंटुंबावर सशस्त्र हल्ला झाला. यामध्ये धर्मेंद्र नंदकुमार राणे (वय ३६ रा. राणे आळी, आवास) यांचा मृत्यू झाला, तर विवेक नंदकुमार राणे, विश्वास नदकुमार राणे, आणि करुणा नंदकुमार राणे या तीघांना गंभीर जखमी करण्यात आले आहे.
त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या सशस्त्र हल्ला व खून प्रकरणी देवेंद्र लक्ष्मण म्हात्रे, अंकित अशोक राणे, शुभम संतोष पाटील, वैभव लक्ष्मण म्हात्रे, पुनम देवेंद्र म्हात्रे आणि सिया देवेंद्र म्हात्रे या सहा जणांवर गुन्हा दाखल करुन या पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहा. पोलिस निरिक्षक दीपक भोई यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक नंदकुमार राणे (वय 34) व त्यांचे कुटूंबीय त्यांच्या फोर व्हीलर गाडीमध्ये पावसाचे पाणी जात असल्याने त्यांच्या घरासमोरील शेडमध्ये ती लावत होते. यावेळी संशयित देवेंद्र लक्ष्मण म्हात्रे, अंकित अशोक राणे, शुभम संतोष पाटील, वैभव लक्ष्मण म्हात्रे, पुनम देवेंद्र म्हात्रे आणि सिया देवेंद्र म्हात्रे यांनी चाकू, सुरा आणि तलवारीसह तेथे येऊन शिवीगाळ करून मागील भांडणांचा मनात राग धरून भाडणास प्रारंभ केला.
यातील संशयित आरोपीत वैभव म्हात्रे व अंकित राणे यांनी फिर्यादी विवेक नंदकुमार राणे यांचा भाऊ विश्वास नदकुमार राणे (वय ३२) यास पकडून ठेवून संशयित आरोपी देवेंद्र म्हात्रे याने त्यांच्या छातीमध्ये चाकू भोसकून खून केला. तसेच फिर्यादी विवेक नंदकुमार राणे यांचा भाऊ विश्वास धर्मेंद्र यास सोडविण्यास गेले असता संशयित आरोपीत शुभम पाटील याने विश्वास यास पकडून अंकित राणे याने ठारच मारतो असे बोलून त्याच्या छातीत देखील चाकू भोसकला. फिर्यादी विवेक नंदकुमार राणे यांना वैभव म्हात्रे यांनी पकडून संशयित आरोपी सिया म्हात्रे यांनी त्यांच्या पाठीमागे कमरेवर सुरा मारला. त्यावेळी त्यांची आई तिला पकडण्याकरता आली असता पूनम म्हात्रे हीने विवेक नंदकुमार राणे यांच्या आईच्या मानेवर सुरा मारून गंभीर दुखापत केली.
या सशस्त्र हल्ला व खून प्रकरणी जिल्हा रुग्णालयात दाखल जखमी विवेक नंदकुमार राणे यांनी रुग्णालयातच मांडवा पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारी नुसार मांडवा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन, संशयित आरोपिंना सत्वर अटक केली आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहा. पोलिस निरिक्षक दीपक भोई यांनी सांगितले आहे..संपूर्ण घटनेनंतर आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना सायंकाळी 5 वाजता अलिबाग सत्र न्यायालयात हजर केले होते… सदर आरोपीना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे…