रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
थोर वैज्ञानिक आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने रोहा तहसील शेजारी खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या वाहनतळाची दुर्दशा झाली आहे. रोहा नगरपालिकेने मोठा गाजावाजा करून या वाहनतळाचे उद्घाटन केले होते. मात्र सध्या या वाहनतळात तब्बल 100 बकऱ्यांचा शेड तयार करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे.
या प्रकारामुळे रोहा नगरपालिकेच्या प्रशासनाची कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.जागतिक पातळीवर नावाजलेल्या महान व्यक्तिमत्त्वाच्या नावाने बांधलेल्या वाहनतळाचा उपयोग शेळ्यांचा आश्रयस्थान म्हणून केला जातो, ही बाब रोह्यात नागरिकांमध्ये संताप आणि उपहासाचा विषय बनली आहे.
या परिसरात ‘यूपीएससी–एमपीएससी मार्गदर्शन शिबिरांद्वारे विद्यार्थी घडवले जातात, आणि दुसरीकडे कलाम यांच्या नावाच्या वाहनतळात बकऱ्यांचे प्रशिक्षण केंद्र सुरू आहे काय?’ अशी मिश्किल प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली. हा प्रकार निंदनीय असून, नगरपालिका प्रशासनाने या प्रकारावर खुलासा करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
रोहा नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे हा वाहनतळ मूळ उद्देशच हरवून बसला आहे. सार्वजनिक रकमेचा अपव्यय आणि महान व्यक्तिमत्त्वाचा अवमान अशा दोन्ही पातळ्यांवर ही बाब गंभीर मानली जात आहे. प्रशासनाने तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.