खोपोली शहरात नागरी समस्यांचा भडिमार… आम आदमी पार्टीने भरवले तक्रारी व समस्यांचे प्रदर्शन…

0
8

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-

खोपोली शहरात प्रचंड प्रमाणात नागरी समस्या वाढलेल्या आहेत.गटारे साफ होत नाहीत, आठ आठ दिवस गटारांमधून कचरा काढून रस्त्यावर ठेवला जातो व तो उचलला जात नाही. दोन दोन महिने नगरपरिषदेचा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, शहराला फक्त एकच वेळ पाणी पुरवठा केला जातो, त्यातूनच शहराची तहान भागवावी लागते. तीन-तीन दिवस शिळफाटा भागात पाणीपुरवठा होत नाही व कोणत्याही प्रकारची सूचना नागरिकांना मिळत नाही अशी अवस्था शहराची झालेली आहे, नागरिकांना टँकरने पाणी पुरवावे लागते. घाणीचे साम्राज्य शहरात प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे, सफाई होत नाही, घंटागाडी येत नाही, अशा एक ना अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. गटारी तुटलेल्या आहेत, रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत, भुयारी गटार योजनेसाठी खोदलेली रस्ते अजून दुरुस्त करण्यात आलेली नाहीत, दवाखान्यात औषधे उपलब्ध नाहीत, शाळांची बिकट अवस्था आहे अशा प्रचंड समस्या खोपोली नगरपरिषद प्रशासनाबाबत नागरिकांच्या आहेत. अशी माहिती आप प्रदेश संघटन सचिव डॉ. पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

त्यांनी पुढे माहिती देतांना सांगितले की शहरात विजेचा प्रचंड लपंडाव सुरू आहे. महावितरण चे अधिकारी अजिबात लक्ष देत नाहीत. नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली जाते. रस्त्याच्या मध्यभागी असलेले खांब हलवण्यासाठी कोणतेही उपाययोजना केली जात नाही.खालापूर तालुक्यात एकही कार्डियाक ॲम्बुलन्स उपलब्ध नाहीये त्याबाबत वारंवार पाठपुरावा करून सुद्धा तहसीलदार कार्यालयातर्फे उदासीनता पाहायला मिळत आहे.खोपोली शिळफाटा येथील नागरिक  दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडी पासून त्रस्त आहेत. त्याकरिता आम आदमी पार्टी उपोषण करू शकते परंतु नगरपरिषद प्रशासन किंवा तहसीलदार कार्यालय त्याकडे लक्ष देत नाही. त्यांना वाहतूक कोंडी दिसत नाही का ? असा नागरिकांचा सवाल आहे.या सर्व समस्यांबद्दल आवाज उठवण्याकरिता आम आदमी पार्टी प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार निवेदने देत असते परंतु उत्तरे मिळत नाही त्यामुळे आम आदमी पार्टीने खोपोली शहरात नागरिकांपर्यंत आपल्या समस्या व तक्रारी पोहोचवण्याकरिता अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. नागरिकांनी कोणत्याही दबावाला न जुमानता, तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडा व तुमच्या समस्या हे प्रशासनापर्यंत पोहोचल्याच पाहिजे त्यासाठी आम आदमी पार्टी एक सक्षम माध्यम म्हणून उभी आहे, असे आप प्रदेश संघटन सचिव डॉ. पठाण यांनी सांगितले.यावेळी सदर आंदोलनात आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव डॉ. पठाण,खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान, शहर उपाध्यक्ष विवेक वाघमारे, शहर सचिव चंद्रप्रकाश उपाध्याय व अन्य सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.