माणगावात पर्यावरण दिनानिमित्त नगर पं. वृक्षारोपणाचा हरित उपक्रम…

0
76

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत माणगाव नगरपंचायतीने ‘माझी वसुंधरा 6.0’ अभियानांतर्गत व्यापक वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला. २२ मे ते ५ जून २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या पर्यावरण आणि स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने वाकडाई मंदिर परिसर व नानोरे गावात सायंकाळी ४.३० वाजता वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात एकूण ३८० रोपांची लागवड करण्यात आली.यामध्ये देशी प्रजातींच्या झाडांसह काजू, सीताफळ यांसारख्या फळझाडांचाही समावेश होता.पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या निर्देशांनुसार, “प्लास्टिक प्रदूषणाचे जागतिक निर्मूलन” ही या वर्षीची अधिकृत थीम ठरली असून त्याला अनुसरून जनजागृतीपर उपक्रम राबवले जात आहेत. मुख्याधिकारी श्री. संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी आणि नगर पं. कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी पर्यावरण जागृतीसाठी रांगोळ्या, फलक, घोषवाक्ये आणि नाटिकांचाही वापर करण्यात आला. शहरातील विविध मोकळ्या जागा, शाळा, सार्वजनिक उद्याने आणि शासकीय इमारतींच्या परिसरात ही लागवड झाली. लावलेल्या झाडांच्या देखभालीसाठी “ट्री गार्डियन्स” हा स्वयंसेवक गट तयार करण्यात आला असून झाडांचे जतन आणि नियमित पाणीपुरवठा यावर भर दिला जाणार आहे. कार्यक्रमाचा समारोप पर्यावरण शपथ घेत एकात्मिक हरित संकल्पाने करण्यात आला.