नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
नेरळ पोलीस ठाणे हद्दीत काही ठिकाणी बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे अखेर पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहेत.या पावलामुळे परिसरातील गुन्हेगारी नियंत्रणात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
नेरळ शहरात व परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनू नये तसेच सार्वजनिक ठिकाणी,बाजारपेठा, महत्त्वाचे चौक आणि प्रमुख रस्ते या ठिकाणी गुन्हेगारी कृत्ये वाढू नये.यामध्ये खिसेकापू,चोरी,गोवंशीय जनावरे तस्करी, वाहतूक नियमांचे उल्लंघन यांचा समावेश होता.
पोलिसांकडे गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज फार महत्त्वाचे असते.मात्र, मुसळदार पावसामुळे महत्त्वाच्या ठिकाणी लावलेले कॅमेरे बंद अवस्थेत असल्यामुळे पोलीस तपासात अडथळा येऊ नये.
नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या पुढाकाराने नेकसस नेटवर्क निलेश म्हसे व वैभव पटवर्धन यांच्या विनामूल्य सहकार्याने हे कॅमेरे दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. नेरळ , शेलू, कळंब, डिकसळ, बोपेले व अन्य ठिकाणी कॅमेरे कार्यरत असून,त्यांचं नियंत्रण थेट पोलीस ठाण्यातील नियंत्रण कक्षातून केले जात आहे.
शिवाजी ढवळे म्हणाले, “नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटीव्ही एक प्रभावी माध्यम आहे. आता हे कॅमेरे कार्यरत झाल्यामुळे गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे अधिकच सोपे होईल आणि गुन्हेगारीला आळा बसेल.नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, या निर्णयामुळे त्यांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला आहे की पोलिस प्रशासन त्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूक आहे.