पेण शिवसत्ता टाइम्स (धम्मशिल सावंत):-
सुधागड तालुक्यातील डोंगराळ माळ रान पठारावर असलेल्या हातोंड, गोंदाव आणि माठळ या गावांमध्ये दरोडे खोरांनी अक्षरश थैमान घातल्याचे समोर आले आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात रात्री १ ते ४ वाजण्याच्या सुमारास ४ ते ५ जणांच्या सशस्त्र टोळीने धुमाकूळ घालत घरांवर दरोडे टाकले. या टोळीने कोयता आणि तलवारसदृश्य शस्त्रांचा धाक दाखवत घरातील सोने, रोकड, बँक पासबुक आणि चेकबुक असा मौल्यवान ऐवज लंपास केला. या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून, स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र गावकर्यांच्या मनात या घटनेचे दाट भय असून दरोडेखोरांनी झटापटीत कुणाचा जिव घेतला असता तर काय घडले असते या विचाराने गावकरी हादरले आहेत. गोंदाव, हातोंड आणि माठळ या गावांमध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी एकामागून एक घरांना लक्ष्य केले. गोंदाव येथील एका घरात चोरी करून दरोडेखोरांनी हातोंड गाव गाठले. या टोळीने घरातील लोकांच्या गळ्यावर कोयता ठेवत आणि तलवारीचा धाक दाखवत लूटमार केली. हातोंड येथील चव्हाण कुटुंबीयांच्या घरात देखील दरोडेखोरांनी लूटमार केली. या दरम्यान, गावकऱ्यांनी तत्काळ जांभूळपाडा पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच दरोडेखोर पुढच्या गावात दरोडा टाकत होते, ज्यामुळे पोलिसांना त्यांचा पाठलाग करणे आव्हानात्मक ठरले.घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक शिवतारे, पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र दौडकर,पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर, तसेच स्थानीय गुन्हे शाखेच्या टीमने भेट देऊन तपास सुरू केला आहे.