अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
मारळ गावातील प्रसिद्ध मार्लेश्वर देवस्थानाचे मुख्य पुजारी श्री जंगम महाराज यांच्या हस्ते किहीम येथील सागरेश्वर मंदिरातील पवित्र शिवपिंडीवर विधीवत अभिषेक करण्यात आला. अभिषेकावेळी भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्रोच्चार आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात हा धार्मिक विधी पार पडला.
अभिषेकानंतर श्री जंगम महाराज यांनी किहीममधील श्री चामुंडादेवी मंदिर व काळभैरव महाराज मंदिरालाही भेट देऊन दर्शन घेतले.या भेटीदरम्यान त्यांनी मंदिर परिसरातील व्यवस्थापन, देवस्थान समितीचे कार्य आणि गावकऱ्यांच्या सहभागाचे कौतुक केले.
या कार्यक्रमात सुदेश सावंत, योगेश साळुंखे,अभिजित महाले,दिनेश वर्तक, हरेश साळुंखे, आत्माराम साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी मिळून धार्मिक कार्यक्रमाची सुंदर आखणी केली. तसेच यावेळी भाविकांनी महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
कार्यक्रमानंतर किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांच्या निवासस्थानी श्री जंगम महाराज यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.पारंपरिक पद्धतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व गावकऱ्यांतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.या संपूर्ण भेटीदरम्यान गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून या कार्यक्रमाला विशेष महत्त्व लाभले.