चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
खालापूर तालुक्यातील विणेगाव–कलोते दरम्यान आज (8 ऑगस्ट 2025) दुपारी 1.30 च्या सुमारास जुन्या मुंबई–पुणे हायवेवर भीषण अपघात झाला. TVS NITRO (MH-03-EP-2863) स्कुटीवरील चालक राहुल रज्जाम बात्तूला (वय 20, रा. मानखुर्द, मुंबई) आणि त्याचा मित्र विशाल गायकवाड (वय 19, रा. पुणे) हे मुंबईकडून पुण्याकडे वेगाने जात असताना चालकाचे स्कुटीवरील नियंत्रण सुटले. स्कुटी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळल्याने दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यानंतर पुढील उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलला रवाना करण्यात आले.मात्र,उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. मृतांपैकी राहुल बात्तूला यांनी हेल्मेट परिधान केले होते,तर मागील आसनावरील विशाल गायकवाड यांनी हेल्मेट घातले नव्हते. अपघाताचा तपास खालापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.