साकोरा पेडकाई शिक्षण संस्थेत राखी पौर्णिमा उत्साहात साजरा… चिमुकल्यांच्या मनातील प्रेम आणि आपुलकीचे भावनिक दृश्य…

0
5

नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-  

नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील पेडकाई शिक्षण संस्था येथे रक्षाबंधनाचा सण राखी पौर्णिमा अत्यंत आनंददायी, उत्साही आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या वागणुकीतून सणाची खरी खोली आणि बंधुभावाचे महत्त्व अधोरेखित केले.

या दिवशी शाळेतील चिमुकल्या बहिणींनी आपल्या लाडक्या भाऊरायांचे औक्षण करून त्यांच्या मनगटावर प्रेमाची राखी बांधली. प्रत्येक बहिणीच्या चेहऱ्यावर भाऊबद्दलचे प्रेम, ममता आणि आपुलकी झळकत होती. भाऊ-बहिणींचं नातं लहानपणी भांडणांनी भरलेलं असलं, तरी त्यातील जिव्हाळा आणि नात्याची वीण आयुष्यभर टिकणारी असते, हे या प्रसंगातून स्पष्टपणे दिसून आले.

राखी बांधल्यानंतर भाऊरायांनी आपल्या बहिणींना पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स यांसारख्या शालेय वस्तू प्रेमपूर्वक भेट दिल्या. या छोट्या भेटवस्तूंमध्येही भावनांची श्रीमंती दडलेली होती. विशेष म्हणजे, यावेळी काही विद्यार्थी मिश्किलपणे म्हणताना ऐकू आले…”माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या बहिणींना १५०० रुपये महिन्याला देण्याची घोषणा केली आहे, मग आपण तरी काही ना काही देऊ या!”

या उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाण आणि जबाबदारीची भावना विकसित होताना दिसली. सण म्हणजे केवळ एक औपचारिकता नाही, तर नातेसंबंध, प्रेम, जबाबदारी आणि सांस्कृतिक मूल्यांची साक्ष देणारी एक पवित्र परंपरा आहे, हे मुलांनी प्रत्यक्ष अनुभवले.

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी सर्व मुलांना स्वतःच्या खर्चाने मिठाई वाटून आनंदात भर घातली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संस्थेतील शिक्षक, शिक्षिका व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सुरळीतपणे पार पडले. शाळेच्या संपूर्ण परिसरात पारंपरिक सजावट करून उत्सवाचे वातावरण अधिक सजीव करण्यात आले होते.

पेडकाई शिक्षण संस्था केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरती मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी सतत आग्रही असल्याचे या कार्यक्रमातून पुन्हा सिद्ध झाले.