माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-
रायगड जिल्हा हा राजकीयदृष्ट्या नेहमीच गोंधळात राहणारा जिल्हा… महायुतीचे सरकार आल्यानंतरही जिल्ह्याचा पालकमंत्री ठरलेला नाही.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी आपली राजकीय चतुराई दाखवत दोन्ही मुलांची आमदारकी सुरक्षित केल्याची चर्चा रंगत आहे. महाडच्या स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादीत आणत त्यांनी शिवसेनेचे भरत गोगावले यांना थेट आव्हान दिले. त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य राजीव साबळे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन आदिती तटकरे (श्रीवर्धन) आणि अनिकेत तटकरे (कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघ) यांच्या विरोधातील ताकद कमी केली. साबळ्यांचा प्रभाव श्रीवर्धन मतदारसंघातील अनेक भागात असून, 2018 मध्ये अनिकेत तटकरे यांच्या विरोधात त्यांनी लढत दिली होती. साबळ्यांच्या नाराजीचा फायदा घेत तटकरेंनी त्यांना पक्षात ओढले. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 941 मतदारांपैकी 469 रायगडमध्ये असून, त्यामुळे साबळ्यांचा पक्षप्रवेश तटकरे कुटुंबासाठी फायदेशीर ठरू शकतो, अशी चर्चा आहे. तसंच, कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचे विरोधक सुधाकर घारे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून तटकरेंनी शिवसेना विरुद्ध आपले फिल्डिंग अधिक मजबूत केले आहे.एकूणच, रायगडमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तटकरे विरुद्ध गोगावले संघर्ष आणखी चिघळणार, हे निश्चित मानले जात आहे.