विद्युत वाहिनी अंगावर पडून महिलेचा मृत्यू,परिसरात संताप व्यक्त…

0
3

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-

खालापूर तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत चौक क्षेत्रातील जांभिवली या गावात चालू विद्युत वाहिनी तुटून एका वयोवृद्ध महिलेने आपला जीव गमावला.जुनाट जीर्ण झाल्याला विद्युत वाहिनी जोरदार वारा आणि पाऊस यामुळे तुटतात, याची वारंवार तक्रार या परिसरातील जागरूक नागरिक यांनी करून देखील वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केल्याने आज एक जीव गेल्याचे सुरेश गावडे यांनी सांगितले.पहाटे गावातील एक वृद्ध महिला सुलोचना दत्तात्रेय गावडे वय वर्ष ६३ या घराच्या मागील बाजूस असलेल्या प्रसाधन गृहाकडे प्रार्थविधीसाठी जात असताना अचानक त्यांच्या अंगावर विद्युत प्रवाह सुरू असलेली विद्युत वाहिनी तुटून पडली त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.घरातील त्यांचा नातू व शेजारील लोकांच्या लक्षात ही घटना आल्यावर त्यांनी आरडाओरड केल्यावर गावातील लोक जमा झाले, तातडीने वीज वितरण कंपनीच्या लोकांना पाचारण करून वीज प्रवाह बंद केला, घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार,चौक प्रभारी विशाल पवार, पोलीस उप निरीक्षक शिवाजी जुंदरे,उप कार्यकारी अभियंता महादेव मुंडे, सहाय्यक वीज अभियंता योगेश देसाई यांना कळविल्यावर सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली.पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय चौक येथे पाठविण्यात आला.सदर महिलेचा मृत्यू वीज वितरण यांच्या हलगर्जीपणामुळे व वेळीच तारांची दुरुस्ती न केल्यामुळे झाला असा आरोप ग्रामस्थ यांनी केला असून योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.विशेष बाब म्हणजे दोन खांबांच्या मधील विद्युत वाहिन्यांना आठ आठ जोड दिले आहेत, त्यामुळे या वाहिन्या आणखी कमजोर होऊ न गेल्या आहेत.या परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठा बाबत अनेक पक्षांनी मोर्चे काढले, तीव्र निषेध व्यक्त केला, पाचच दिवसांपूर्वी आमदार महेश बालदी यांनी अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांची संयुक्त बैठक चौक येथे घेतली होती, तरीही यात सुधारणा न झाल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या परिसरातील जांभिवली या गावातच फक्त श्रीकृष्ण मंदिर आहे.त्या निमित्ताने उत्सव साजरा होत असताना या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. येणाऱ्या गणेशोत्सव काळात अशी घटना घडू नये, योग्य ती दुरुस्ती करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.