पदाचा गैरवापर करून अवैद्य उत्खननास परवानगी देत शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवण्यासह बळवली ग्रामस्थांची फसवणूक करणाऱ्या ग्राम सेविका शीतल जाधव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी…

0
3

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी शासकीय अधिकारी यांच्याकडून बनावट कागदपत्रे घेऊन बेकायदेशीर रित्या उत्खनन करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचां महसूल बुडवून मलिदा लाटण्याचे काम रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू आहे.अशीच एक घटना पेण तालुक्यातील बळवली ग्रामपंचायत हद्दीत उघडकीस आली आहे.

रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेले पेण तालुक्यातील बळवली ग्राम पंचायत हद्दीत ग्राम सेविका शीतल जाधव यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत बेकायदेशीर रित्या बनावट कागदपत्रे यांच्या आधारे गौण खनिज उत्खनास परवानगी देऊन शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून ग्राम पंचायत हद्दीतील ग्रामस्थ आणि शासनाची आर्थिक हेतू साध्य करण्यासाठी फसवणूक केली असल्याने बळवली ग्रामस्थ यांनी रायगड जिल्हा परिषद मधील ग्राम पंचायत विभागाबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे.

पेण तालुक्यातील बळवली ग्रामपंचायत हद्दीतील मौजे बळवली गावातील सर्व्हे क्रमांक ८२/अ मिळकतीत एकूण ८२/अ/१, ८२/अ/२, ८२/अ/३ आणि ८२/अ/४ असे एकूण ४ पोट हिस्से आहेत. सदर मिळकतीत ८२/अ/१, ८२/अ/२, ८२/अ/३ ही सर्व्हे क्रमांक असलेली जागा हिरामण चांगु सुर्वे आणि वामन शंकर काकडे यांची आहे. त्यापैकी काही जागा हिरामण चांगु सुर्वे यांनी सुजाता विश्वास पाटील यांना विकली आहे. ८२/अ/४ ही मिळकत ही शेतकरी सहकारी सोसायटी बळवली यांच्या नावाने आहे. तर  त्या मध्ये वनविभाग देखील आहे. ८२/अ या मिळकतीत एकूण चार सर्व्हे असले तरी त्यामध्ये कोणत्याही प्रकारची आकारफोड किंवा पोटफोड झालेली नाही. तरीही हिरामण चांगु सुर्वे यांनी त्यांच्या नावे असलेल्या काही जमिनीची विक्री केली आहे. परंतु ८२/अ ही मिळकत पूर्ण गोळा असल्याने कोणत्या क्षेत्राची विक्री केली आहे हे स्पष्ट होत नाही. असे असताना देखील सदर जागेमध्ये काम करण्यास तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी यांनी शेतकरी सहकारी सोसायटी बळवली यांना म्हणजेच बळवली ग्रामस्थ यांना विश्वासात न घेता, ग्रामसभा न घेता ना हरकत दाखला आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी दिला आहे. तसेच सदर जागेत मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले असून शासनाला कोणत्याही प्रकारची रॉयल्टी भरण्यात आली नाही असे तहसील पेण कार्यालय यांच्याकडून माहितीच्या अधिकारात कळविण्यात आले आहे.

ग्रामपंचायत अधिकारी शीतल जाधव यांनी बळवली ग्रामस्थ आणि शासनाची फसवणूक केली आहे असे बळवली ग्रामस्थ बळीराम पदम पाटील यांचे मत आहे. याबाबत त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासहित पंचायत समिती पेण, पोलीस स्टेशन पेण यांच्याकडे लेखी तक्रार करून त्यांना अपेक्षित असा न्याय मिळाला नाही म्हणून बळीराम पदम पाटील हे बळवळी गावाच्या हितासाठी स्वातंत्र्य दिनापासून रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.