पेण उपकोषागार अधिकारी वैशाली शिर्के यांचा मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गौरव…

0
6

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशिल सावंत):-

मुख्यमंत्री 100 व 150 दिवसीय कार्यालय सुधारणा कार्यक्रमात पेण कोषागार अधिकारी श्रीमती वैशाली संदीप शिर्के यांच्या कुशल कार्यप्रणाली व गुणवत्तापूर्ण कामगिरीने कार्यालयाचा जिल्ह्यात पहिला आणि विभागात दुसरा क्रमांक प्राप्त झालाय. राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. गुणवत्तापूर्ण कार्यासाठी पेण उपकोषागार कार्यालयाच्या कोषागार अधिकारी वैशाली शिर्के व सहकाऱ्यांचा देशाच्या स्वातंत्र्यदिनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ही केवळ व्यवस्थापन मोहीम नाही तर आपल्या कर्तव्याप्रती उत्तरदायित्व, जनहीताची भावना, पारदर्शकता आणि लोकहितासाठी कार्यक्षम प्रशासनाचे प्रतिबिंब आहे. लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात अग्रेसर राहून या उत्कृष्ट अधिकाऱ्यांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. भविष्यातही या कार्यालयानी आपली गुणवत्ता कायम टिकवून ठेवावी असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले. या पुरस्कारामुळे भविष्यात अधिक लोकाभिमुख, पारदर्शक कारभार करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे श्रीमती शिर्के यांनी सांगितले. संपूर्ण जिल्ह्यातील कोषागार कार्यालयांना मिळालेला हा पुरस्कार आहे. कोषागार कार्यालयामध्ये सर्व सरकारी अधिकारी/कर्मचारी यांना वेतन/ इतर भत्ते देयके; सेवा निवृत्ती नंतर मिळणारी पेन्शन /मुद्रांक वितरण असे मोठ्या प्रमाणात कामकाज सुरू असताना कामातील सचोटी; आणि नीटनेटके पण तसेच कार्यालयातील संबंधित येणाऱ्या प्रत्येक व्यतीसोबत उत्कृष्ट सुसंवाद आणि वेळेत काम करण्याची योग्य पद्धत हे सर्व सांभाळून आज हा सन्मान प्राप्त करणे म्हणजे कौशल्य आहे. पुरस्कार सन्मान सोहळ्यास
पुरस्कार मानकरी तथा उपकोषागार अधिकारी श्रीमती वैशाली संदीप शिर्के सोबत जिल्हा रायगड कोषागार अधिकारी दीपक बोडके ,तसेच अप्पर कोषागार अधिकारी दामले,अप्पर कोषागार अधिकारी देवेंद्र पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.