रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आलेल्या कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत जेएसजब्ल्युच्या फेज थ्री प्रकल्पाला नागरिकांनी जोरदार समर्थन दिले. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने या सभेचे आयोजन कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या प्रांगणात शुक्रवार (ता.१५) रोजी सकाळी करण्यात आले होते. नव्या पिढीच्या उज्वल भविष्यासाठी उपस्थित ग्रामस्थांनी हात उंचावून कंपनीचे विस्तारीकरण व्हायलाय पाहिजे,अशी जोरदार मागणी केली.
वाढत्या बेरोजगारीने येथील तरुण पिढी देशोधडीला लागत आहे. शिक्षण घेवूनही हाताला काम नसल्याने अलिबाग, पेण तालुक्यातील तरुण वर्ग निराश होत असल्याने पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यु कंपनीच्या विस्तारीकरणाची मागणी करण्यासाठी जिल्ह्यातील लाखो तरुण रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. आज कुसुंबळे ग्रामपंचायतीमध्येही असेच चित्र पहायला मिळाले. शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या अध्यक्षतेसाठी ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आयोजित विशेष ग्रामसभेत जेएसडब्ल्यु कंपनीच्या संदर्भात विषय चर्चेत येतात उपस्थित नागरिकांनी आमच्या मुलांना नोकरीसाठी कोणत्याही परिस्थिती कंपनीचे विस्तारीकरण झालेच पाहिजे, अशी जोरदार मागणी करत विषय लावून धरला. त्यामुळे ग्रामपंचायतीलाही हा एकमुखी ठराव मंजूर करावा लागला. उपस्थित ९३५ नागरिकांनी कंपनीच्या समर्थनार्थ सह्या केल्या आहेत. पावसाचा जोर कायम असताना हजारो नागरिक आज ध्वजावंदन समारंभानंतर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेसाठी उपस्थित होते.कंपनीच्या समर्थनार्थ उपस्थित नागरिकांनी एकमुखी पाठिंबा देण्यासाठी हात उंचावून प्रकल्पासाठी २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसुनावला कंपनीच्या बाजूने समर्थन असल्याचे जाहिर केले.