माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
माणगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत ७८ वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीच्या उन्मेषात आणि उत्साहाच्या जल्लोषात साजरा करण्यात आला. शुक्रवारी, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी अचूक ७.३० वाजता शाखा व्यवस्थापक सुशील भस्मे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. सलामी, घोषणाबाजी आणि राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर भारावून गेला.
शाखेच्या आत व बाहेर केलेली तिरंगी सजावट, फुलांची आरास, फुगे डेकोरेशन, आकर्षित रांगोळी आणि विद्युत रोषणाई हा सोहळ्याचा विशेष आकर्षण ठरला. देशभक्तीच्या वातावरणाने सजलेली शाखा नागरिकांच्या उत्साहाचे केंद्र बनली. दरम्यान, पूर्वसंध्येला ग्राहकांसाठी विशेष उपक्रमांतर्गत तिरंगा व मिठाईचे वाटप करण्यात आले होते, ज्याचे सर्वत्र कौतुक झाले.
या प्रसंगी व्यवस्थापक सुशील सर यांनी प्रेरणादायी भाषण करून सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. “आर्थिक क्षेत्राचा विकास हा राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे. आपण आपल्या सेवेतून व कर्तव्याने देशाच्या बळकटीस हातभार लावूया,” असे आवाहन त्यांनी केले.
सोहळ्यानंतर कर्मचारी व सुरक्षा रक्षकांनी एकमेकांना शुभेच्छा देत एकात्मता आणि देशभक्तीचा संदेश दिला. अशा प्रकारे माणगाव एसबीआय शाखेत १५ ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन सोहळा अविस्मरणीय ठरला.