रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
देशभरात बेरोजगारीची समस्या उग्र रूप धारण करतेय,हीच बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी सर्वत्रच नवनव्या प्रकल्पाना चालना दिली जातेय. तिसऱ्या मुंबईच्या दिशेने झेपावणाऱ्या रायगडात आता नवनवे उद्योग, प्रकल्प प्रस्थापित होतायत.
रायगडच्या पेण तालुक्यात डोलवी आणि वडखळ मध्ये विस्तारनाऱ्या नवीन प्रकल्पाकडे विकास आणि रोजगाराची नामी संधी म्हणून स्थानिक सकारात्मक दृष्टीने पाहू लागलेत. त्यामुळे गावकऱ्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवत स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी पुढाकार घेतलाय. कोकणात एकीकडे मोठमोठे येणारे प्रकल्प गुजरात कडे वळत आहेत तर दुसरीकडे येऊ घातलेल्या प्रकल्पाला अनेकजणांकडून विरोध होताना पहायला मिळतोय. दुसरीकडे जिल्ह्यात येऊ घातलेले नवे प्रकल्प अनेकांच्या विरोधी भूमिकेमुळे परजिल्ह्यात,परराज्यात जात असल्याने येथील स्थानिकांनी नव्या प्रकल्पाना पाठिंबा देण्याची भूमिका घेतलीय. रायगडच्या भूमिपुत्रांना ,स्थानिकांना रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता रायगड मधील वडखळ आणि डोलवी भागात येणारे मोठमोठे प्रकल्प उभारले जावे आणि अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावावा ही भावना ठेवून प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला जातोय. जे एस डब्ल्यू प्रकल्पाच्या नवीन विस्तारीकरणाला विरोध करणाऱ्या संजय जांभळे यांच्या जावई व मुलीने मात्र कंपनीच्या नवीन प्रकल्पाला पाठिंबा दिला असल्याचे समोर आले आहे.