माणगाव नगरीत दहीहंडीचा जल्लोष; खांदाड गावात गोविंदांचा उत्साह…

0
4

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

माणगाव नगरीत ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव जल्लोषात पार पडला. खांदाड गावात सालाबादप्रमाणे यंदाही युवा गोविंदांनी हंडी फोडून सणाचा आनंद लुटला. दुपारी उशिरापर्यंत गावात विविध ठिकाणी युवकांनी दहीहंडी बांधल्याचे चित्र दिसून आले.

विविध राजकीय पक्षांच्या वतीने दहीहंडीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात व दिमाखात आयोजित करण्यात आले होते. पाहणाऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती; मात्र मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने लोकांना लांबूनच कार्यक्रमाचा आनंद घ्यावा लागला. हीच परिस्थिती मंत्री भरत शेट गोगावले पुरस्कृत दहीहंडी उत्सव 2025 तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, माणगाव शहर आयोजित दहीहंडीच्या ठिकाणीही पाहायला मिळाली.

विशेष बाब म्हणजे एक ठिकाण हे शासकीय जागेवर, तर दुसरे खासगी जागेवर आयोजित केले होते. दोन्ही ठिकाणी पाणी साचल्याने नगर पंचायत तर्फे पाणी उपसण्याचे प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, दोन्ही ठिकाणी रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय पथक उपस्थित असल्याचे आमच्या प्रतिनिधीने पाहिले.

संपूर्ण दिवस वरुणराजाने तुफान बरसात केल्याने शहरात अनेक भागांत पाणीच पाणी झाले होते. दरम्यान, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांच्या फोटो नावासह छापलेले टी-शर्ट गोविंदा उत्सवाच्या निमित्ताने खांदाड गावात वितरित करण्यात आल्याचेही विशेषत्वाने निदर्शनास आले.