महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
महाडमध्ये नामदार भरतशेठ गोगावले यांच्या नावाने कार्यरत असणाऱ्या भरतशेठ गोगावले मित्र मंडळा तर्फे यंदाही भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने आयोजित होत असलेल्या या दहीहंडीला रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावर्षी महाडसह गोरेगाव, लोणेरे, माणगाव, रोहा आणि श्रीवर्धन येथे भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणी दीड लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. महाड शहरातील दहीहंडी विशेष आकर्षणाचा विषय ठरली. आठ थर लावणाऱ्या पथकांसाठी १ लाख, सात थरांसाठी २५ हजार रुपये, तसेच पाचव्या थरापासून विविध बक्षिसांची लयलूट करण्यात आली. रत्नागिरी येथून माजी आमदार संजय कदम यांनी चार गोविंदा पथके महाडमध्ये आणली होती. तसेच सुप्रसिद्ध कीर्तनकार भगवान कोकरे यांनीही आपले पथक उत्सवासाठी आणले होते. गोगावले मित्र मंडळाने भगवान कोकरे यांच्या पथकाला ५० हजार रुपयांचे विशेष बक्षीस दिले. माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचे पथक आणि माजी आमदार संजय कदम यांचे पथक यांनी आठ थर रचून प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस पटकावले.या उत्सवाला शंभरहून अधिक गोविंदा पथकांनी हजेरी लावली. महाड शहरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. या सोहळ्याला नामदार भरतशेठ गोगावले यांच्यासह त्यांची पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुषमा गोगावले, शिवसेना शेतकरी कामगार सेना अध्यक्ष विजय आप्पा सावंत, भाजपा जिल्हा सरचिटणीस बिपिन दादा महामुनकर, शिवसेना जिल्हा समन्वयक राजेश देशमुख, उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडिक, तालुकाप्रमुख रवींद्र तर्डे, शहरप्रमुख डॉ. चेतन सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.या उत्सवात एक विशेष क्षणही अनुभवायला मिळाला. भाजपा माजी तालुकाप्रमुख जयवंत दलवी यांच्या कन्येने यकृतदान करून आपल्या वडिलांचे प्राण वाचवले. तिचा सत्कार नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला.अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या दहीहंडी उत्सवात गोगावले यांनी माजी आमदार संजय कदम व नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या समवेत गोविंदांमध्ये सहभागी होऊन नृत्याचा आनंद लुटला.