जेएसडब्लू थ्री फेज प्रकल्प हद्दपार केलाच पाहिजे… जनसुनावणीला हजारोंनी जमून विरोध नोंदवा…

0
69

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडखळ-डोलवी परिसरात जे.एस.डब्लू कंपनीच्या थ्री फेज प्रकल्प विस्तारीकरणाविरोधात शेतकरी, स्थानिक नागरिक आणि भूमिपुत्रांचा प्रचंड एल्गार उसळलाय. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असून शेतकरी वर्ग, स्थानिक नागरिक आणि पुढच्या पिढ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार असल्याचा इशारा देत रायगड जिल्हा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अनंत भुरे यांनी सर्वांनी लढ्यात सामील होण्याचे आवाहन केलंय.

22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसुनावणीला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून प्रकल्पाचा विरोध नोंदविण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आलं. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, जे.एस.डब्लू कंपनीमुळे आधीपासूनच वायू, जल, ध्वनी आणि भूप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतंय. शेतीचे उत्पादन घटले, नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं, मृत्युदर वाढलाय. नव्या प्रकल्पामुळे परिस्थिती अधिकच भीषण होणार असल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केलीय.

अनंत भुरे यांनी स्पष्ट केलं – “कोणत्याही प्रलोभनाला किंवा आमिषाला बळी न पडता पुढच्या पिढ्यांचं भविष्य वाचवण्यासाठी एकत्र या. आपली वडिलोपार्जित जमीन आणि निरोगी आरोग्य यासाठी प्रकल्पाला हद्दपार करणं हाच काळाचा आदेश आहे.”

स्थानिक शेतकऱ्यांनी कंपनीवर गंभीर आरोप करताना सांगितलं की, रोजगाराचं आमिष दाखवूनही प्रत्यक्षात परप्रांतीयांना काम मिळतंय. तर स्थानिक बेरोजगार, प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्र वंचितच राहिलेत. त्यामुळे आता कुठल्याही फसव्या आश्वासनाला बळी न पडता, एकजुटीने संघर्ष उभारण्याची वेळ आल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

पर्यावरण तज्ज्ञ आणि शेतकरी संघटनांचा इशारा – या प्रकल्पामुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होईल. सजीव सृष्टी, जलचर आणि जैवविविधतेचं मोठं नुकसान होईल. नागरिकांवर दिर्घकालीन परिणाम होत असून, पुढच्या पिढ्यांसाठी स्वच्छ हवा आणि पाणी शिल्लक राहणार नाही, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

रायगड जिल्ह्यातील लोक आता मोठ्या लढाईसाठी सज्ज झालेत. 22 ऑगस्टला होणाऱ्या जनसुनावणीला हजारो नागरिकांनी उपस्थित राहून सरकारला व कंपनीला ठाम संदेश द्यावा – की रायगडकरांच्या जमिनी, पर्यावरण आणि भवितव्याशी कुठलाही तडजोड केली जाणार नाही.