रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
पाली सुधागडात दहिहंडी चा आगळा वेगळा भव्य उत्सव व जल्लोष पहावयास मिळाला. भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई यांच्या संकल्पनेतून व विशेष पुढाकाराने पालीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य दिव्य अशा दहीहंडी महोत्सवाचे अतिशय नियोजनबद्ध , मनोरंजनात्मक व वैभवपूर्ण आयोजन करण्यात आले होते. पाली सुधागड तालुका भारतीय जनता पार्टी पुरस्कृत भव्य दहीहंडी महोत्सव 2025 मध्ये गोविंदा पथकांनी अक्षरशः बक्षिसांची लयलूट केली. भाजपच्या मानाच्या दहीहंडीचे माखन चाखत 2 लक्ष 22 हजार 222 च्या दहीहंडीवर नाव कोरणाऱ्या नागोठणेच्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने आठ चित्तथरारक थर लावून आकर्षक चषक व रोख पारितोषिक जिंकले. या महोत्सवात खासदार धैर्यशील पाटील यांची खास उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. सुधागडवासीय बाल गोविंदा पथकांसाठी भाजपची 51 हजारांची मानाची दहीहंडी व आकर्षक चषक देखील पर्वणी ठरली. सुधागड पाली मर्यादित दहीहंडी मध्ये यंग स्टार कुंभार आळी व भोईआळी पाली गोविंदा पथकाला प्रत्येकी 25 हजार प्रमाणे समान रकमेचे पारितोषिक देऊन चिट्टी द्वारे यंग स्टार कुंभार आळी गोविंदा पथकाला चषक देऊन गौरविण्यात आले. या महोत्सवात सात थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांसाठी रोख रक्कम 10 हजारांचे पारितोषिक तर 6 थरासाठी 6 हजार रुपयांचे पारितोषिक अशी एक अनोखी पर्वणी लाभल्याने गोविंदा पथकात उत्साह व नवचैतन्य पहावयास मिळाले. यावेळी पाच , सहा व सात थर लावून मानाची सलामी देणाऱ्या आई जोगेश्वरी गोविंदा पथक 7 थर, जय भवानी गोविंदा पथक रोठ खुर्द रोहा 7 थर, श्री बापदेव महाराज गोविंदा पथक अष्टमी रोहा 7 थर, जय हनुमान गोविंदा पथक कोलेटी 7 थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना 10 हजार रुपये रोख व आकर्षक चषक देऊन गौरविले. तसेच विशेष पारितोषिक म्हणून जय भवानी रोठ खुर्द रोहा महिला गोविंदा पथक 5 थर दहा हजार रुपये व आकर्षक चषक, चौडेश्वरी गोविंदा पथक वरवठणे 5 थर दहा हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई म्हणाले की या महोत्सवात शिस्त, संयम , समर्पण व एकतेचा अनोखा संगम पहावयास मिळाला. रायगड जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या गोविंदा पथकांनी, महिला गोविंदा पथकांनी आपले कौशल्य पणाला लावत चित्तथरारक सलामी देऊन आपल्या गावाचे विभागाचे नाव रोशन केले. पालीतील दहीहंडी महोत्सवाला उपस्थित राहून सर्वांनी शांततेचे सहकार्य करून महोत्सव यशस्वी केल्याबद्दल सर्व गोविंदा पथकांचे देसाई यांनी विशेष आभार मानले. याचवेळी सुधागड भाजप अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे व सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेऊन दहीहंडी महोत्सव यशस्वी केल्याबद्दल प्रकाशभाऊ देसाई यांनी सर्वांचे कौतुक केले.