खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
कर्जत-खालापूर 189 विधानसभा मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ उघड झालाय. खोपोली शहरातील शिळफाटा, प्रभाग क्रमांक 10 मधील मतदार याद्या तपासल्या असता तब्बल 140 मतदारांची नावे दोन दोन वेळा असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. देशात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर वोट चोरीचे आरोप केले होते. त्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने खोपोलीत तपासणी केली असता हा घोटाळा उघड झाला. शिळफाट्यात साडेचार ते पाच हजार मतदार असून त्यापैकी 140 मतदारांची डबल नावे आहेत. याशिवाय स्थलांतरित झालेले, मयत झालेले लोक अजूनही यादीत असून त्यांची नावे वगळली गेलेली नाहीत.
आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ. पठाण यांनी गंभीर शंका व्यक्त केलीय की, जर एका प्रभागात एवढा गोंधळ असेल तर अख्या कर्जत-खालापूर विधानसभेत ७ ते ८ हजार मतदारांची नावे डुप्लिकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील निवडणुकीत कर्जत-खालापूरमधील उमेदवार केवळ 5000 मतांनी पराभूत झाला होता आणि हा पराभव या घोळामुळेच झाला असावा, असा थेट आरोप करण्यात आलाय.
या प्रकरणावर आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी तहसीलदार व निवडणूक आयोगाला पत्र देत तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केलीय. पुढील निवडणुकीत जर पारदर्शक व सुधारित यादी नसेल तर अख्या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभं राहील, असा इशारा देखील खान यांनी दिलाय. आता या गंभीर प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. निवडणूक आयोगाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, ही जनतेची मागणी आहे.