श्रीवर्धनचा आगळा वेगळा गोकुळाष्टमी उत्सव… 

0
10

श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (आनंद  जोशी):-

कोकणात नारळी पौर्णिमा,गौरी-गणपती हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.एकेका गावाचे एकेका सणाचे वेगळेपण असते.श्रीवर्धन मध्ये आजही गोकुळाष्टमीचा सण पारंपारिक  पद्धतीने साजरा केला जातो.श्रीवर्धनमध्ये आळीला ‘पाखाडी’ या नावाने संबोधले जाते. सर्वसाधारणपणे प्रत्येक पाखाडीत श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा केला जातो.रात्री बाराच्या सुमारास श्रीकृष्ण जन्म सोहळा झाल्यानंतर त्या त्या पाखाडींतील गोपाल खालू-बाजाच्या गजरात तास-दोन तास नाचून आनंद  व्यक्त करतात.दुस-या दिवशी  म्हणजे गोपाळ काल्याचे दिवशी पाखाडी-पाखाडींचे बाळगोपाळ खालू-बाजाच्या तालावर एकमेकांच्या हातात हात घालून खूप उत्साहात आणि आनंदात नाचतात.याला ‘दावण’ असे म्हणतात. त्या दिवशी गावातील वातावरण अतिशय उत्साहाचे असते.संध्याकाळी ब-याचशा दावणी श्री सोमजाई मंदिराच्या पटांगणात उत्साहाने नाचतात.यंदा पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गावांत सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

तर श्रीवर्धनच्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरांतही पारंपारिक आणि वैशिष्टय़पूर्ण पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो… तिथे तीन दिवस प्रख्यात कीर्तनकारांची कीर्तने असतात.श्री कृष्ण जन्माचे दिवशी मध्यरात्री बारा वाजता फुले उधळून मोठ्या श्रद्धेने श्रीकृष्ण जन्म साजरा केला जातो.दुस-या दिवशी म्हणजे गोपाळ काल्याचे दिवशी दुपारी 11 वाजता काल्याचे कीर्तन होते.त्यानंतर स्थानिक भजन सुरु होते.भजनानंतर सुमारे एक ते दीड  तास पुरुषांचे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात.त्यात फुगडी,बस फुगडी,दंड फुगडी,हमामा,हुंबरी तसेच दळण- कांडण इ.प्रतिकात्मक खेळ खेळले जातात… यावेळी तरुणांचा सहभाग फार मोठा आणि उत्साही असतो.तर तिसऱ्या दिवशी दुपारी महाप्रसाद  व रात्री लळिताचे कीर्तन व आरती  होऊन उत्सवाची सांगता होते.