रायगड शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत कर्मचारी १९ ऑगस्ट २०२५ पासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. शासनाने १४ मार्च २०२४ रोजी कर्मचाऱ्यांचे नियमित सेवेत समायोजन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र दीड वर्ष उलटूनही अंमलबजावणी झाली नसल्याने नाराज कर्मचाऱ्यांनी संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, नियमितीकरणाबरोबरच मानधन वाढ, Loyalty Bonus, EPF, विमा सुविधा, तसेच बदली धोरण यांसारख्या महत्त्वाच्या मागण्या प्रलंबित आहेत. या संदर्भात आरोग्यमंत्री यांनी ८ व १० जुलै २०२५ रोजी शिष्टमंडळाला सकारात्मक आश्वासन दिले होते. तथापि, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
या आंदोलनादरम्यान महानगरपालिका हद्दीतील सर्व आरोग्यसेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहेत. JSSK, DEIC, RBSK, SNCU, NBSU, ब्लड बँक, डायलेसिस सेवा, लसीकरण सत्रे तसेच विविध ऑनलाईन व ऑफलाईन अहवाल तयार करण्याची कामे पूर्णपणे बंद राहणार असल्याची नोटीस कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला दिली आहे.
आरोग्य अभियानातील कर्मचारी अनेक वर्षे अल्प मानधनावर कार्यरत असून, ग्रामीण व शहरी भागात आरोग्यसेवा सुरळीत ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांचे स्पष्ट मत आहे की, शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही. त्यामुळे आता सरकारकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.