मुंबई-गोवा महामार्गची दर्दनाक कहाणी… बायपास, अपघात, पूर आणि सरकारांच्या अपयशाची कहाणी…

0
7

रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-   

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 हा आज प्रवाशांसाठी विकासाचा मार्ग न राहता दु:खाचा महामार्ग ठरला आहे… कारण वर्षानुवर्षे माणगाव व इंदापूर येथील अपूर्ण बायपास रस्ता लोकांना रोजच्या रोज वाहतूक कोंडी संकटात ढकलत आहे…

केंद्रीय सरकारकडून वारंवार मुदती जाहीर करण्यात आल्या, पण प्रत्येकवेळी अपयशाचाच सामना करावा लागला… एनएचएआय च्या ढिसाळ कारभारामुळे प्रकल्प चक्क उपहासाचा विषय ठरला आहे. आणि आता या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढे येत, “अंतर्गत रस्ते सुधारू” अशी घोषणा केली आहे… पण प्रत्यक्षात चित्र असे की लोक तासन्‌तास वाहनांसह अडकून पडले असून, जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत…

अविरत पावसाने परिस्थिती अधिकच बिकट केली असून माणगावाजवळील गोद नदीवरील कलमजे पुलावरून वाहणारे पाणी व इंदापूर येथील बॅकवॉटरमुळे महामार्ग जलमय झाला आहे… त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून प्रशासन व एनएचएआय यांनी वाहने गावातील अरुंद मार्गावर वळवली, पण त्यामुळे प्रवाशांचे हाल अधिकच वाढले…

१८ ऑगस्ट २०२५, सोमवार रात्रीची एका प्रवाशाची कहाणी हाच या महामार्गाचा खरा चेहरा दाखवते… “मी श्रीवर्धनहून पनवेलकडे रात्री 08 वाजता माणगावमार्गे निघालो… पण माणगाव शहरात कालमजे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक रात्री 10 च्या आसपास बंद होती. पोलिसांनी वळसा घालून निजामपूरमार्गे भालेकडे पाठवले… मात्र इंदापूरजवळ गेल्यावर तिथेही प्रचंड पाणी साचले होते… एवढे पाणी होते की बसदेखील बुडू शकत होती… माझ्या गाडीबरोबर किमान २५ वाहने अडकली होती… आम्ही तासन्‌तास उभे राहिलो. शेवटी पहाटे 03 वाजता परत माणगावला आलो. त्यानंतर साडेचारच्या सुमारास वाहतूक सुरू झाली आणि सकाळी ६ वाजता कसेबसे पनवेल गाठले.”

ही फक्त एक घटना नाही, तर हा एनएच-66 चा शाप आहे… अपूर्ण बायपास, अमर्याद विलंब आणि बेजबाबदार प्रशासनामुळे महामार्ग हा सततचा डोकेदुखी व जीवघेणा मार्ग झाला आहे… वेळेत काम पूर्ण झाले असते, तर ना कोंडी झाली असती ना पूरस्थितीत महामार्ग ठप्प झाला असता…

आता तर गणेशोत्सव जवळ येत आहे… हजारो भाविक महामार्गावर प्रवास करणार जर पुन्हा पूर आला किंवा एखादा मोठा अपघात झाला तर जबाबदारी कोण घेणार ? केंद्र सरकार? राज्य सरकार ? की गप्प बसलेले एनएचएआय ? जनतेला रोज शासनाच्या अपयशाची किंमत चुकवावी लागत आहे…एनएच-66 हा आता विकासाचा महामार्ग नाही; तर तो झाला आहे अपयशाचा राष्ट्रीय महामार्ग…