महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
महाड तालुक्यातील शिवथर विभागात आज सकाळी ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कुंभेशिवथर गावातील स्मशानभूमी वाहून गेली असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. रात्री थोडासा पाऊस कमी झाला होता, मात्र आज सकाळी पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली.
या पावसामुळे शिवथर विभागातील आंबेशिवथर, अंबेनळी, सह्याद्री वाडी या गावांचा काहीकाळ संपर्क तुटला होता. रस्ते वाहून जाणे, पाण्याचा जोर वाढणे आणि भूस्खलनाच्या धोक्यामुळे नागरिक मोठ्या चिंतेत आहेत. विशेषतः स्मशानभूमी वाहून गेल्याने गावकऱ्यांमध्ये मोठा संताप व भीतीचे वातावरण पसरले आहे.
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने नवीन पुलाची मागणी केली आहे. आंबेशिवथर ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, प्रत्येक पावसाळ्यात अशी परिस्थिती निर्माण होते, परंतु प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नाहीत. मुसळधार पावसामुळे झालेल्या या नुकसानीनंतर ग्रामस्थांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन केले असून त्वरित मदत व पायाभूत सुविधा उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.