अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
मुरुड तालुक्यातील मिठेगार येथे आज पुन्हा एकदा दरड कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.यावर माजी आमदार पंडितशेठ पाटील आक्रमक झाले असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. पंडितशेठ म्हणाले की, २०१८-१९ मध्ये आमदार असताना मीच हा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला होता. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी सूर्यवंशी साहेबांनी प्रत्यक्ष पाहणी करून हा परिसर डेंजर झोन घोषित केला होता. तसेच JSW कंपनीच्या मदतीने नागरिकांची सोय करण्यात आली होती.पण त्यानंतर प्रशासनाने एकही पाऊल पुढे टाकले नाही. प्रोटेक्शन वॉल मंजूर झाल्याचे असूनही त्याचा पाठपुरावा झाला नाही, आणि आज त्याच निष्काळजीपणामुळे पुन्हा जीव गेला आहे. त्यांनी संतप्तपणे प्रश्न उपस्थित केला की,दरडग्रस्त जिल्हा म्हणून रायगडला २००५ पासून घोषित करूनही प्रशासन फक्त कागदोपत्रीच का काम करतंय?दासगाव, खालापूरसारख्या दुर्घटनांमधून काहीही धडा घेतला नाही का?घटना घडल्यावरच प्रशासन का धावपळ करतं? आधीच नागरिकांना अलर्ट देण्यात तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांचा हात आखडता का? पंडितशेठ यांनी ठाम मागणी केली की, दरडग्रस्त गावांचं तात्काळ पुनर्वसन करावं. डोंगराखाली वसलेली गावं हलवावी किंवा तिथे भक्कम उपाययोजना कराव्यात. हिमाचल प्रदेशातील दुर्घटनांकडून धडा घेतला नाही तर रायगडमध्ये आणखी बळी जातील, याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशाराही त्यांनी दिला. पंडितशेठ म्हणाले,आज रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पहिला बळी गेला आहे. उद्या आणखी किती जीव गमवावे लागतील? लोकांच्या जीवाशी खेळ करणारे हे शासन चालवणं थांबवलं पाहिजे. जर प्रशासन सतर्क राहिलं नाही तर मी जनतेसोबत रस्त्यावर उतरेन….दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत बैठका घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.