रस्त्यांच्या दुरावस्थेवरून अलिबागेत शेकापचा संताप… शेकापचे कार्यकर्ते रस्त्यावर,मानसी दळवींविरोधात घोषणाबाजी…

0
3

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-

रायगड जिल्ह्यातील अलिबाग,मुरुड आणि रोहा तालुक्यांतील रस्त्यांची दुरावस्था, मुरुड मिठेखार येथे दरड कोसळून झालेली दुर्घटना आणि नागरिकांच्या जीवनाशी निगडित असलेले प्रलंबित प्रश्न या सर्व मुद्द्यांवरून शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आक्रमक झाला आहे.स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप करत आज शेकाप कार्यकर्त्यांनी अलिबाग शहरात जाहीर आंदोलन छेडले.या आंदोलनादरम्यान आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यातील अनेक प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.गेल्या काही महिन्यांपासून पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून,खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.विद्यार्थ्यांना,शेतकऱ्यांना,कामगारांना आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.शेकापने यापूर्वी प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी केली होती,पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून या प्रश्नांकडे कानाडोळा केल्याचा आरोप करण्यात आला.अलिबाग शहरातील मुख्य चौकात झालेल्या आंदोलनात शेकाप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत, प्रखर घोषणाबाजी केली.नागरिकांच्या समस्या, विकासकामांचा ठप्प वेग आणि मानसी दळवींच्या कथित वर्तनाविरोधात घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.