मुंबई शिवसत्ता टाईम्स (प्रविण पाटील):-
रायगड – रत्नागिरीचे खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय इंधन समितीचे अध्यक्ष खा. सुनील तटकरे यांना दैनिक लोकमत या आघाडीच्या वृत्तपत्राने आयोजित ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनमध्ये भारत भूषण पुरस्कार देऊन लंडन येथे मोठ्या दिमाखात सन्मानित करण्यात आले.
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, नाट्य व साहित्य अशा विविध क्षेत्रात केलेल्या त्यांच्या उल्लेखनीय व प्रभावी योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठित सन्मान तटकरे यांना प्रदान करण्यात आला.गेल्या ४५ वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात विविध मंत्रीपदे भूषवून शोषित व वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. सुनील तटकरे साहेब चार वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार झाले असून प्रशासनाचा दांडगा अनुभव आणि जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे.
अर्थ व नियोजन, नगरविकास, जलसंपदा, अन्न व नागरी पुरवठा अशी विविध महत्त्वाची मंत्रीपदे सांभाळून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न विशेषत्वाने अधोरेखित झाले.या सन्मान सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, लोकमत समूहाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी भारतातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही गौरविण्यात आले.